त्यादिवशी सुद्धा नेहेमीप्रमाणेच अँपॉईंटमेंट्स सुरु होत्या. नेहमीप्रमाणेच जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण घेऊन भविष्य सांगणं सुरु होतं. शेवटच्या अपॉइंटमेंटसाठी एक जोडपं आलं, खुर्चीवर बसलं, मी तारीख वेळ ठिकाणं विचारलं आणि ते सांगणार, इतक्यात, इतका वेळ व्यवस्थित सुरु असलेला माझा लॅपटॉप अचानक हँग झाला. "होतं असं कधी कधी" असं म्हणून मी तो reboot केला, सॉफ्टवेअर ओपन करून Birth details टाकणार इतक्यात माझं इंटरनेट बंद पडलं. "इतके योगायोग एकाच वेळेला?" मी मनात म्हंटलं आणि त्याच क्षणी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला, मी त्यांना म्हंटलं "तुमच्या दोघांपैकी कोणाची साडेसाती सुरु आहे का?". ते दोघे अमराठी असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांना त्यांची रास (चंद्र रास) माहिती नव्हती. मी त्यांना म्हंटलं "आतापर्यंत सुरळीत सुरु असलेली माझी सिस्टिम तुम्ही आल्याआल्या बंद पडली आणि ते देखील दोनदा ! माझा अनुभव मला असं सांगतो कि नक्की तुमच्या दोघांपैकी कोणाचीतरी साडेसाती सुरु असली पाहिजे. Of course, पत्रिका ओपन झाली कि ते कळेलच !". थोड्या वेळाने त्यांचे birth details सॉफ्टवेअर मधे टाकले आणि लक्षात आलं कि त्या दोघांपैकी बायकोची मकर रास होती आणि तिची साडेसाती सुरु होती. माझा संशय खरा ठरला ! पुढे त्यांच्याशी बोलताना कळलं कि अपॉइंटमेंट साठी येत असताना देखील त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता आणि त्यामुळे त्यांना अपॉइंटमेंटसाठी सुद्धा वेळेवर पोहोचता आलं नव्हतं. हा असा अनुभव जेव्हा जातकाचा वाईट काळ सुरु असतो त्या वेळेला येतो. दर वेळेला साडेसातीच सुरु असायला पाहिजे असं नाही पण कुठला तरी वाईट काळ सुरु असतो.
हा झाला एक लहानसा अनुभव ! ज्योतिषी रोज अनेक जुन्या नवीन लोकांना भेटत असतात, रोज नवीन अनुभव, त्यामुळे काहीकाही वेळेला माणसांचे नुसते चेहेरे बघून सुद्धा बऱयाच गोष्टी पत्रिका न बघताच कळतात. कोणाचा कुठला ग्रह बलवान असावा ह्या विषयी सुद्धा काही गोष्टींचे अंदाज पत्रिका न बघताच बांधता येतात आणि नंतर पत्रिका बघितल्यावर त्याची खात्री पटते. माझ्या ज्योतिषी मित्रांशी बोलताना देखील, काही माणसांना बघून "ह्याचा शुक्र खूप स्ट्रॉंग दिसतोय हां !" किंवा "ह्याचा शनी बलवान आहे बरं का !" असे उद्दगार तोंडून निघतात. काही लोकांना तर ज्योतिषी पत्रिकेच्या परिभाषेतूनच ओळखतात, जसं "तो मेष लग्न वृश्चिक रास आहे रे" किंवा "ती कर्क लग्न मीन रास आहे हां !", समोरच्या ज्योतिषाला काय कळायच ते बरोबर कळतं !
शेवटी, एखाद्या विषयाच्या थेअरीचा कितीही अभ्यास केला तरी बऱ्याच वेळेला अनुभव हाच गुरु ठरतो तो असा !