Monday 17 December 2018

मला मुक्ती मिळेल का?



साधारण ५५ वर्ष वयाच्या एका Client ने मला दोन प्रश्न विचारले, "माझी नोकरी टिकेल का? आणि मला काही आजार होतील का?" पत्रिकेनुसार याची उत्तरं देउन झाल्यावर त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला कि "या जन्मात मला मुक्ती मिळेल का?" ज्योतिषशास्त्रात मुक्ती मिळेल किंवा नाही यासाठी अनेक नियम दिलेले आहेत जसं अमुक तमुक ग्रहांची युती असेल तर, व्ययेश अमुक तमुक राशीत ह्या ह्या भावात असेल तर वगैरे असे अनेक, पण मी यापैकी कुठलाही नियम न बघता सरळ "नाही" असं उत्तर दिलं ! आता तुम्ही म्हणालं कि असं कसं काहीच न बघता तुम्ही उत्तर दिलत? सांगतो ! 'मुक्ती' ही आध्यात्मिक उन्नतीची शेवटची पायरी, षडरिपु, भौतिकसुखं ह्या सगळ्या पल्याड ती असते, 'जन्म मृत्यु' च्या फेऱ्यातुन सुटका, त्या नंतर पृथ्वीवर कधीच जन्म होत नाही (१% झालाच तरी तो फक्त लोकं कल्याणासाठी होतो). असं असताना नोकरीच्या चिंतेत आणि आजाराची भीती असलेला माणूस हा मुक्तीच्या जवळ 'ह्या जन्मात' तरी पोहोचू शकणार नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे कुठल्याही ज्योतिषाकडे "मला मुक्ती मिळेल का हो?" असा प्रश्न विचारायला गेले नव्हते. मुळात अध्यात्माच्या शेवटच्या पायरीवर असलेला माणूस कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन काहीच विचारणार नाही.
प्रश्नांची उत्तरं देताना ज्योतिषाने तारतम्य ठेवणं देखील आवश्यक आहे. "मी या वर्षी मंगळावर जाईन का? वय वर्ष ४० असताना आता माझी उंची वाढेल का?" या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देताना पत्रिका बघण्याची गरज नसते कारण अशा प्रश्नांची उतरं 'नाही' च असतात.

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com

Thursday 9 August 2018

प्रारब्धाचा पोस्टमन



प्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनीलची पत्रिका 'सीए होणार' हे ठळकपणे दर्शवित होती.  सहा महिन्यानंतरचा काळ पास होण्यासाठी खूप चांगला होता म्हणून मी त्याला त्या काळात परीक्षा द्यायला सांगितलं आणि सहा महिन्यांनी सुनील नुसताच पास नाही तर चांगल्या मार्कांनी सीए झाला. सुनील म्हणाला, "सर, मी आज फक्त तुमच्यामुळेच सीए होऊ शकलो" !

प्रसंग २ : अमितच लग्न होऊन २ वर्ष झाली होती पण बायकोशी अजिबात पटत नव्हतं. रोजच्या भांडणाला कंटाळून तो माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला होता. दोघांच्याही पत्रिका 'घटस्फोट होणार' हे स्पष्टपणे दाखवत होत्या त्यामुळे त्याला तसं स्पष्टपणे सांगावंच लागलं. अमित खूप निराश झाला आणि म्हणाला कि सर मला तुमच्याकडून सगळंच निगेटिव्ह ऐकायला मिळालं.  तुम्ही काहीतरी पॉसिटीव्ह सांगाल असं वाटलं होतं. 

वरील दोन्ही प्रसंग जरी वेगळे असले तरी त्यातून हे कळतंय कि यशाचे श्रेय किंवा अपयशाचं दूषण हे ज्योतिषालाच दिलं जातं. माझ्यामते  हे दोन्हीही चुकीचंच आहे. ज्योतिषी हा कधीच तुमचं यश किंवा अपयश ठरवतं नाही, तो फक्त आणि फक्त पत्रिकेत काय आहे एवढंच सांगू शकतो, तुमचं नशीब तो ठरवत नाही, किंबहुना ठरवूच शकत नाही. जर तुमचं नशीब तो ठरवू शकत असता तर ज्योतिषाने पहिल्यांदा स्वतःच नशीब बदलून घेतलं असतं. आपलं नशीब हे आपल्या प्रारब्धामुळेच असतं तेंव्हा त्यासाठी ज्योतिषाला दूषण किंवा श्रेय देण्याचं काहीच कारण नाही. हां, उपायांच्यामुळे वाईट गोष्टींची तीव्रता कमी होऊ शकते हे बरोबर आहे पण ज्या गोष्टी मूळ पत्रिकेतच नाहीत त्या उपाय करून आणता येत नाहीत. 

पत्रिकेत वाईट गोष्टी असताना ज्योतिषाने तुम्हाला बरं वाटण्यासाठी कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरीही वाईट असेल तर वाईटच होणार, तात्पुरते तुम्ही खुश व्हाल पण पुढे घडायचं ते घडणारच आहे. पत्रिकेत वाईट गोष्टी असताना सुद्धा काही ज्योतिषी समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून फक्त चांगलंच सांगतात, ही फक्त वरवरची मलमपट्टी होते, फार काळ जातकाला (ज्याची पत्रिका आहे तो) ह्याचा उपयोग होत नाही, कधी ना कधी सत्याला सामोरं जावंच लागतं.  इथे ज्योतिषी आणि जातक दोघांचीही चूक असते. काही जातकांची, 'आपल्याला चांगलं भविष्य सांगेल तो "चांगला" ज्योतिषी', अशी बालीश विचारसरणी असते, हा शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. चांगलं किंवा वाईट ह्यापेक्षा "खरं" भविष्य सांगेल तो चांगला ज्योतिषी, असं म्हणणं योग्य आहे. काही जातक एखाद्या ज्योतिषाचा संदर्भ दुसऱ्याला देताना देखील "ते 'चांगलं' सांगतात, त्यांच्याकडे जा" असं सांगतात, ह्यापेक्षा "ते 'खरं' सांगतात, त्यांच्याकडे जा, असं सांगणं अभिप्रेत आहे.     

ज्योतिषी हा एखाद्या पोस्टमनसारखा असतो. तुमच्या नशिबाचे किंवा प्रारब्धाचे निरोप पोहोचवणारा दूत ! त्याला निरोप लिहिण्याचा किंवा ते बदलण्याचा अधिकार नाही, फक्त ते निरोप चांगल्या रीतीने आणि वेळेत जातकापर्यंत पोहोचवणे एवढंच त्याच काम ! 

एखाद्या ज्योतिषाचे आभार मानणं किंवा त्याला  थँक्यू म्हणणं ठीक आहे पण खरे आभार देवाचे माना कि त्याने तुमचं 'खरं' भविष्य सांगण्याची शक्ती त्या ज्योतिषाला दिली, कारण शेवटी कुठलाही ज्योतिषी हा असतो फक्त तुमच्या "प्रारब्धाचा पोस्टमन" !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com



Thursday 19 April 2018

वाटचाल ज्योतिषशास्त्राची..


एका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अमुक दिवशी एका ठराविक वेळी वराहाचे म्हणजे रानडुकराचे शिंग पोटात घुसून मृत्यु पावेल. झालं! राजानं फर्मान सोडलं की राज्यात एकही रानडुक्कर शिल्लक राहता कामा नये. राजाच्या हुकुमानुसार राज्यात एकही रानडुक्कर शिल्लक राहीलं नाही. मिहिरनी सांगितल्यानुसार राजपुत्र त्या ठराविक वयाचा झाला. त्यांनी सांगितलेला तो दिवस देखील उजाडला. राजपुत्राला महालातच त्याच्या कक्षात ठेवलं होतं, सतत पहारा होता,  मिहिर ज्योतिषाने सांगितलेली ती ठराविक वेळ झाली आणि राजाने मिहिरला सांगीतल की, बघ! तुझं भविष्य खोट झालं. मिहिर हसला व म्हणाला की, 'शक्यच नाही. राजपुत्र कक्षात नाही. त्याला बोलावून बघा हवं तर! राजाने राजपुत्राला बोलावून आणायला माणसं पाठवली. राजपुत्र कक्षात नव्हता, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली पण राजपुत्र मिळेना...काही वेळाने शिपायांनी बघितलं की राजपुत्र राजमहालाच्या गच्चीवरून खाली पडून राजाच्या राज्याचे प्रतिक असलेल्या वराहाच्या लोखंडी प्रतिकृतीचे शिंग पोटात घुसल्यामुळे मरण पावला आहे. राजाला राजपुत्राच्या मृत्युचे दुख: होऊन देखील ज्योतिष मिहिरच्या ज्ञानाची खात्री पटली होती. अशा या मिहिर ज्योतिषाला पुढे 'वराहमिहिर' या नावाने ओळखले जाऊ लागले. ही झाली एक ऐतिहासिक गोष्ट, सांगायचा उद्देश हा की, ज्योतिषशास्त्र हे किती प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. याचा आपल्याला अंदाज येईल. नक्की ज्योतिषशास्त्राचा उगम कधी झाला? ह्या प्रश्नाचं उत्तर देण थोडसं अवघड आहे. पण अतिप्राचीन म्हणजे अगदी ऋषीमुनींच्या काळापासून ज्योतिषशास्त्र चालात आलेलं आहे आणि पुढे अनेक गुरुजनांनी त्यात अनेक प्रकारे भर घातली. पुढे ज्योतिषशास्त्राच्या किंवा भविष्यकथनाच्या वेगवेगळ्या पध्दती अस्तित्वात येत गेल्या, नुसती नावं घ्यायची म्हटलं तरी पारंपारिक ज्योतिष पध्दती, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती, हस्तसामुद्रीक, संख्याशास्त्र, लालकिताब, रमल, लोलकविद्या, भृगृसंहिता, नाडी ज्योतिष. इथपासून ते टॅरोट (Tarrot) पर्यंत अनेक आहेत. काही ठिकाणी मेंढपाळ नुसते आकाशाकडे बघुन देखील काही गोष्टी वर्तवितात, असही मी ऐकलयं. दैवी उपासनेमुळे किंवा दैवी देणगी लाभलेले काहीजण हे अंर्तज्ञानाने देखील भविष्य कथन करतात. ह्या सर्व भविष्यकथनाच्या पध्दतींमधे अभ्यासावर आधारलेल्या ज्योतिषपध्दतीमध्ये 'कुंडलीशास्त्र' म्हणजेच जन्मकुंडली द्वारे भविष्यकथन करण्याच्या पध्दती ह्या जास्त अचुक मानल्या जातात, कारण त्या व्यक्तीच्या जन्मतारीख, जन्म वेळ व जन्मठिकाणावर आधारीत ज्योतिष पध्दती आहेत. पत्रिकेद्वारे भविष्यकथनाच्या पध्दतीत, दोन मुख्य पध्दती आहेत त्या म्हणजे, पारंपारिक ज्योतिष पध्दती व कृष्णमर्ती पध्दती. त्यामध्ये देखील, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती ही अचुकतेसाठी जास्त ओळखली जाते.

इतक्या अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्र चालत आलेलं असलं तरी ते स्थितीशील (static) मात्र नक्कीच नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात अनेक गुरूजनांनी व अभ्यासकांनी अनेकप्रकारे भर घातलेली आहे, त्यामुळे उगाचच 'एवढ्या जुन्या काळाचे नियम आत्ता कुठे लागु होणार!' असं म्हणून ज्योतिषशास्त्राला कमी लेखायची काही गरज नाही एवढी अनेक वर्ष होऊनदेखील पृथ्वी अजुन सुर्याभोवतीच फिरते आहे ना? चंद्र पृथ्वीभोवतीच फिरतो आहे ना? म्हणजेच काय, तर मुलभूत गोष्टी त्याच असतात पण एखाद्या विषयाची प्रगती होण्याकरीता त्यात भर घालावी लागते आणि ज्योतिषशास्त्रात मुख्यत्वेकरून ही भर घालावी लागते ती ज्योतिष नियमांच्या अवलंबाविषयी (application विषयी) , म्हणजे कसं? समजा, १९५० साली एखाद्या माणसाने ज्योतिषाला विचारलं असत की, 'मला वाहनसुख आहे का?' तर ती एक विचार करण्यासारखी गोष्ट होती. कारण त्या काळात फक्त श्रीमंतांनाच ती चैन परवडत होती, पण हाच प्रश्न आजच्या काळात विचारला तर तो हास्यास्पद ठरेल कारण आज कनिष्ठ मध्यमवर्गाकडे देखील वाहनं (किमान दुचाकी तरी) असतचं! स्वत:ला अति बुध्दीमान समजणारी मंडळी काही वेळेला विचारतात की, 'माहिती तंत्रज्ञान' क्षेत्र (information technology) हे ज्योतिष शास्त्रात कसं बघणार? कारण प्राचीन काळी तर हे क्षेत्र अस्तित्वातच नव्हत! ज्योतिषशास्त्रामधे हे क्षेत्र मंगळ-बुधाच्या अंमलाखाली विचारात घेतलं जातं आणि ते विचारात घेतल्याला सुध्दा आत्ता बराच काळ उलटून गेला आहे.


कुठलही भविष्यकथन करताना 'काळ' आणि 'स्थळ' याच भान सोडून चालत नाही. उदाहरणार्थ, पूर्वीच्याकाळी मुला-मुलींची लग्न ही वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच होत. त्यावेळेला लग्न उशीरा होईल असं भविषयकथन केल्यास त्याचा अर्थ फार फार तर १२-१५ व्या वर्षी होईल, असा होत असे. पण, हेच भविष्यकथन सध्याच्या काळात केलं तर त्याचा अर्थ वयाच्या २८ नंतर किंवा कदाचित आणखी उशीरा असा देखील होऊ शकतो. ग्रह-तारे, राशी, ग्रहांचे भ्रमण ह्या सर्व गोष्टी तशाच असुन देखील काळ बदलल्यामुळे भविष्यकथनात फरक होत जातो, तो असा! भविष्यकथनात 'स्थळाचा' देखील विचार करावा लागतो. समजा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत अमुक अमुक काळात घटस्फोट होण्याची शक्यता आहे, असं असेल आणि तो माणूस जर अमेरिकन असेल तर घटस्फोट नक्की होईल असच सांगाव लागेल. कारण, तिथे 'रात्री झोपल्यावर नवरा खूप घोरतो' ह्या कारणासाठी सुध्दा घटस्फोट घेतला जातो. तेच जर का तो माणूस भारतीय असेल तर मात्र नीट विचार करून मगच उत्तर द्यावं लागेल. कारण भारतात अजुन अमेरिकेइतक्या सहजतेने घटस्फोट देण्याची प्रथा रूढ नाही. एका ज्योतिषाने म्हटल्यानुसार, 'ज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा विलास आहे', हेच खरं !

ज्योतिषशास्त्र हे कायम वादाच्या भोव-यात असतं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्योतिषशास्त्र खरं की खोटं असे कितीही वाद झाले तरी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, इतके अनेक वाद होऊन सुध्दा ज्योतिषशास्त्र अजुन टिकून आहे. आणि जी गोष्ट वादाच्या भोव-यात राहून देखील वर्षानुवर्षे टिकून आहे त्या अर्थी त्यात नक्कीच काहीतर 'तथ्य' असलं पाहिजे कारण ज्यात 'तथ्य' असतं, तेच 'टिकतं' अन्यथा बुडबुड्याप्रमाणे थोड्या कालावाधीनंतर नाहीसं होतं. 

ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, ज्योतिष हे शास्त्र जरी असलं तरी ते २+२=४ असं शास्त्र नाही. मुलत: सगळे नियम थोडयाफार फरकाने तेच असतात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याचं अवलंबन बदलतं जातं. डॉक्टर जसे रोग्याच्या अवस्थेनुसार औषधाची मात्रा ठरवतात तसच प्रत्येक पत्रिकेची गणितं ही वेगवेगळी असतात. 'सब घोडे बारा टक्के', अस चालत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, ज्योतिषशास्त्राची अचुकता ही शास्त्राबरोबरच ज्योतिषी व्यक्तीवर देखील अवलंबून असते. ज्योतिषी व्यक्तीची स्वत:ची बुध्दीमत्ता, आकलन शक्ती, त्याचं ज्योतिषाविषयीचं ज्ञान, त्याचं ज्योतिषाव्यतिरिक्त इतर विषयाचं ज्ञान, इत्यादी अनेक गोष्टींवर ही अचुकता अवलंबुन असते. डॉक्टर अनेक असतात पण तज्ञ डॉक्टर थोडेच असतात, तसच ज्योतिषाच्या बाबतीत देखील आहे. त्याचप्रमाणे, ज्योतिषी व्यक्ती आणि जातक (ज्याच भविष्य बघत आहात तो) ह्यांची नाळ देखील जुळावी लागते, आपल्याला जसं काही वेळेला एखादया डॉक्टरचचं औषध लागू पडतं, इतर डॉक्टरांशी आपलं फरसं जुळत नाही, अगदी तसच इथे सुध्दा आहे.
ज्योतिषशास्त्रात भर घालण्याच काम अनेक ज्योतिषांनी जरी केलेलं असलं तरी ज्या दिग्गजांनी अगदी मुलभूत संशोधन केलय जसं प्रो. के. एस. कृष्णमुर्ती यांनी नवीन ज्योतिष पध्दती शोधली किंवा ज्यांनी कोणी ज्योतिषशास्त्राचं मुळ शोध कार्य केलं असेल त्यांना मानाचा मुजराच करायला हवा! अर्थातच त्यांच्या ह्या कार्याला दैवी मार्गदर्शन लाभल असलचं पाहिजे, त्याशिवाय ते खूप अवघड वाटतं. ज्योतिषशास्त्राची आणखी माहिती करून घेण्याआधी मुळात ज्योतिषशास्त्राची वाटचाल माहित असणंही तितकच महत्त्वाच असतं, म्हणूनच हा लेखप्रपंच!

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com


Wednesday 4 April 2018

लग्नाआधीच घटस्फोटाचे संकेत..

 


"माझं लग्न कधी होईल?" माझ्यासमोर बसलेल्या २५ वर्षाच्या भारतीने (नाव बदललं आहे) प्रश्न विचारला. प्रत्येक लग्नाळू मुलामुलींचा हा नेहमीचा प्रश्न ! मी पत्रिका बघितली आणि दोन मिनिटं काहीच बोललो नाही, काय सांगावं असा प्रश्न पडला. 

ज्योतिषशास्त्रात सप्तमस्थान हे लग्नासाठी बघितलं जातं. कृष्णमूर्ती पद्धतीनुसार भारतीच्या पत्रिकेत सप्तम स्थानाचा उपनक्षत्रस्वामी  शनी षष्ठात होता, त्याचा नक्षत्रस्वामी मंगळ हा देखील कस्प कुंडलीत षष्ठात येत होता. कृष्णमूर्ती पद्धतीत लग्नासाठी २,७,११ ही पूरक स्थानं आणि १,६,१० ही विरोधी स्थानं मानली जातात. इथे पूरक पेक्षा विरोधी स्थानंच जास्त बलवान होती, म्हणजे लग्न तर होणार पण वैवाहिकसुख, संसारसुखाची वानवा दिसत होती. त्यातच तीची साडेसाती देखील सुरु होती. तरीसुद्धा, काही सांगण्याआधी महादशा बघणं नेहमीच महत्वाचं असतं. 'महादशा' म्हणजे 'दशा' ह्या अर्थान नेहमी फक्त वाईट असं नसून, पत्रिकेतला एक मोठा काळ एवढाच घ्यावा, चांगला कि वाईट हे त्या त्या पत्रिकेवर अवलंबून असतं. 

ज्या वयात लग्न होणार आहे त्या वेळची महादशा बघणं आवश्यक असतं. भारतीची केतू आणि त्या नंतरची शुक्राची महादशा देखील षष्ठ स्थान आणि इतर विरोधी स्थानांशी संबंध दाखवतच होती, म्हणजे संसारसुखाचा भाग कठीणच दिसत होता. 

मी म्हंटलं "तुमचं लग्न तर योग्य वयात म्हणजे वेळेतच होणार आहे पण पुढे एक प्रॉब्लेम आहे". "म्हणजे नेमकं काय?" भारतीने विचारलं. मी म्हंटलं "लग्न जरी योग्य वयात होणार असलं तरी तुमच्या पत्रिकेत घटस्फोट होण्याचे संकेत आहेत". "पण माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये, होणार नवरा कोण हे देखील माहीत नाहीये तर मग माझं नवऱ्याशी पटणार नाही हे आधीच कसं सांगता येईल? ह्याच्या आधीही मी काही ज्योतिषांना पत्रिका दाखवली होती पण अस कोणीच सांगितलं नाहीये!" भारतीचा प्रश्न. मी म्हंटलं "खरं म्हणजे वैवाहिक सुख हे नवरा आणि बायकोची दोंघांची पत्रिका आणि Match Making ह्या तीनही गोष्टीवर अवलंबून असतं पण इथे तुमच्याच पत्रिकेत इतके प्रॉब्लेम्स असताना नवऱ्याची पत्रिका आणि match making काहीही जरी असलं तरी त्याने फार काही फरक पडेल असं वाटत नाही. म्हणजे, समजा एखाद्या परीक्षेत ३ पेपर्स आहेत आणि पहिल्याच पेपर मधे जर एखाद्याला १०० पैकी  १० मार्क मिळाले आणि उरलेल्या दोन पेपर्स मधे १०० पैकी ८० जरी मिळाले तरी शेवटी परीक्षा नापासच होणार, हे तसंच आहे ! म्हणून नवरा निवडताना खूप काळजी घेणं तुमच्या बाबतीत फार महत्वाच आहे. दुसरं म्हणजे, इतर ज्योतिषांनी हे तुम्हाला का सांगितलं नाही किंवा का सांगू शकले नाहीत हे मी कसं सांगणार?, मी माझं मत तुम्हाला देऊ शकतो, बाकी कोण खरं आणि कोण खोटं हे येणारा काळच ठरवेल." भारतीने हे सगळं काळजीपूर्वक ऐकलं, समजून घेतलं आणि गेली. 

पुढे साधारण दोन वर्षांचा काळ निघून गेला आणि एके दिवशी भारतीने परत अपॉइंटमेंट घेतली. खुर्चीवर बसल्या बसल्या भारती म्हणाली " मी तुमच्याकडे दोन वर्षांपूर्वी लग्नाचा प्रश्न घेऊन आले होते", मी भारतीला मधेच थांबवत म्हंटलं "माझ्याकडे येणाऱया प्रत्येक Client च सगळं रेकॉर्ड माझ्याकडे असतं, त्यात मी सांगितलेले मुद्दे देखील असतात. आत्ता काय विचारायचं तिथून सुरुवात केली तरी चालेल. भारतीने सांगायला सुरुवात केली "मागच्या वर्षी माझं लग्न झालं. मुलाची जितकी माहिती काढता आली तितकी काढून सुद्धा लग्नानंतर बऱ्याच नवीन गोष्टी लक्षात आल्या, त्याला काही हेल्थ प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी माझ्यापासून पूर्णपणे लपवून ठेवले, त्यातून पुढे आणखी प्रॉब्लेम्स वाढत गेले आणि आता मी घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत आलेली आहे, परत तुमचा सल्ला हवाय !". सगळं ऐकून मी म्हंटलं "आता नवीन सल्ला काय देणार, जो सल्ला द्यायचा होता तो आधीच दिलेला आहे. Things are already very clear. तरीसुद्धा नवऱ्याची पत्रिका बघून एकदा खात्री करू". नवऱ्याच्या पत्रिकेत सुद्धा वैवाहिक सुख बिघडलेलंच होत म्हणजे आता घटस्फोट होणार ही काळ्या दगडावरची रेघ ! निघताना भारती म्हणाली "माझा घटस्फोट होणार आहे हे माझ्या लग्नाच्या आधीच सांगणारे तुम्ही पहिलेच ज्योतिषी आहेत. ह्याची पूर्व सूचना मला तुम्ही दिलेली होती. मी देखील काळजी घेतली पण शेवटी व्हायचं ते झालंच". पुढे काही दिवसांनी भारतीचा घटस्फोट झाल्याचं देखील मला कळवण्यात आलं. 

ज्योतिषी हा फक्त एक पोस्टमन असतो. पत्रिकेतला गूढ संदेश जातकापर्यंत पोहोचवणे, हे त्याचं काम !  त्रयस्थपणे पत्रिका बघून ज्या काही गोष्टी असतील त्या जशाच्या तशा सांगणे हे त्याचं काम. चांगल सांगायचं कि वाईट हे त्याचा हातात नसतं !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
  

Saturday 17 March 2018

पत्रिका न बघताच साडेसातीची खात्री !

   
  त्यादिवशी सुद्धा नेहेमीप्रमाणेच अँपॉईंटमेंट्स सुरु होत्या. नेहमीप्रमाणेच  जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण घेऊन भविष्य सांगणं सुरु होतं. शेवटच्या अपॉइंटमेंटसाठी एक जोडपं आलं, खुर्चीवर बसलं, मी तारीख वेळ ठिकाणं विचारलं आणि ते सांगणार, इतक्यात, इतका वेळ व्यवस्थित सुरु असलेला माझा लॅपटॉप अचानक हँग झाला. "होतं असं कधी कधी" असं म्हणून मी तो reboot केला, सॉफ्टवेअर ओपन करून Birth details टाकणार इतक्यात माझं इंटरनेट बंद पडलं. "इतके योगायोग एकाच वेळेला?" मी मनात म्हंटलं आणि त्याच क्षणी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला, मी त्यांना म्हंटलं "तुमच्या दोघांपैकी कोणाची साडेसाती सुरु आहे का?". ते दोघे अमराठी असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांना त्यांची रास (चंद्र रास) माहिती नव्हती. मी त्यांना म्हंटलं "आतापर्यंत सुरळीत सुरु असलेली माझी सिस्टिम तुम्ही आल्याआल्या बंद पडली आणि ते देखील दोनदा ! माझा अनुभव मला असं सांगतो कि नक्की तुमच्या दोघांपैकी कोणाचीतरी साडेसाती सुरु असली पाहिजे. Of course, पत्रिका ओपन झाली कि ते कळेलच !". थोड्या वेळाने त्यांचे birth details सॉफ्टवेअर मधे टाकले आणि लक्षात आलं कि त्या दोघांपैकी बायकोची मकर रास होती आणि तिची साडेसाती सुरु होती. माझा संशय खरा ठरला ! पुढे त्यांच्याशी बोलताना कळलं कि अपॉइंटमेंट साठी येत असताना देखील त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता आणि त्यामुळे त्यांना अपॉइंटमेंटसाठी सुद्धा वेळेवर पोहोचता आलं नव्हतं. हा असा अनुभव जेव्हा जातकाचा वाईट काळ सुरु असतो त्या वेळेला येतो. दर वेळेला साडेसातीच सुरु असायला पाहिजे असं नाही पण कुठला तरी वाईट काळ सुरु असतो.  

हा झाला एक लहानसा अनुभव ! ज्योतिषी रोज अनेक जुन्या नवीन लोकांना भेटत असतात, रोज नवीन अनुभव, त्यामुळे काहीकाही वेळेला माणसांचे नुसते चेहेरे बघून सुद्धा बऱयाच गोष्टी पत्रिका न बघताच कळतात. कोणाचा कुठला ग्रह बलवान असावा ह्या विषयी सुद्धा काही गोष्टींचे अंदाज पत्रिका न बघताच बांधता येतात आणि नंतर पत्रिका बघितल्यावर त्याची खात्री पटते.  माझ्या ज्योतिषी मित्रांशी बोलताना देखील, काही माणसांना बघून "ह्याचा शुक्र खूप स्ट्रॉंग दिसतोय हां !" किंवा "ह्याचा शनी बलवान आहे बरं का !"  असे उद्दगार तोंडून निघतात. काही लोकांना तर ज्योतिषी पत्रिकेच्या परिभाषेतूनच ओळखतात, जसं "तो मेष लग्न वृश्चिक रास आहे रे" किंवा "ती कर्क लग्न मीन रास आहे हां !", समोरच्या ज्योतिषाला काय कळायच ते बरोबर कळतं !

शेवटी, एखाद्या विषयाच्या थेअरीचा कितीही अभ्यास केला तरी बऱ्याच वेळेला अनुभव हाच गुरु ठरतो तो असा !     

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
  

Tuesday 20 February 2018

पुन्हा तीच चूक..



वैवाहिक आयुष्याबद्दलच्या समस्या घेऊन येणारे clients देखील बरेच आहेत. प्रशांत (नाव बदललं आहे) देखील त्याच समस्येसाठी माझ्याकडे आला होता. त्याची आणि त्याच्या बायकोची पत्रिका बघितली. त्याच्या बायकोची पत्रिका प्रशांतच्या पत्रिकेपेक्षा संसारसुखासाठी फारच वाईट होती. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि "संसारसुख मिळेल का?" ह्या प्रश्नाच उत्तर देण्यासाठी नेहमीच नवरा आणि बायको, दोघांच्याही पत्रिका तपासाव्या लागतात कारण ते एकटयाच्या पत्रिकेवर कधीच अवलंबून असत नाही.  इथे बायकोची पत्रिका संसारसुखाच्या दृष्टीने फारच वाईट होती त्यामुळे बायकोच्या पत्रिकेमुळे सगळा प्रॉब्लेम झालेला होता. प्रशांतची पत्रिका तिच्यापेक्षा संसारसुखासाठी बरीच बरी होती. प्रशांतला म्हंटलं कि पुढच्या काही वर्षांचा कालावधी बघितला असता परिस्थितीत काहीच सुधारणा दिसत नाही, उलट आताचा काळ आणि पुढचे सहा महिने फारच वाईट आहेत, खरं सांगायचं झालं तर १००% घटस्फोट होण्याच्या indications आहेत. माझं बोलणं ऐकून प्रशांतची खात्रीच झाल्यासारखं वाटलं. तो म्हणाला "तुम्ही सांगताय अगदी तशीच परिस्थिती आत्ता आहे. घटस्फोटची प्रक्रिया कधीच सुरु झाली आहे आणि आता कोर्टाच्या एक दोन शेवटच्या तारखा आहेत, घटस्फोट निश्चित आहे". मी त्याला दिलासा देत म्हंटलं "एका अर्थी चांगलंच आहे कारण तुमची पत्रिका तुमच्या बायकोपेक्षा संसारसुखासाठी चांगली आहे. Remarriage च्या वेळेस पत्रिका चांगल्या असलेल्या एखाद्या मुलीशी लग्नं झालं तर निदान पुढे संसार सुखाचा तरी होईल" . 

थोडे दिवस गेले असतील, प्रशांत पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेऊन भेटायला आला. बसल्या बसल्या म्हणाला "सर, तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझा घटस्फोट झाला पण तरीही अजून माझी बायको माझ्या टच मधे आहे आणि ती मला आम्ही परत एकत्र यावं असं सतत सुचवतं असते. मी द्विधा मनस्थितीत आहे, काय करावं कळत नाही ". हे ऐकून मी त्याला बजावलं "अजिबात नाही ! तुझ्या बायकोच्या पत्रिकेतील संसारसुखासाठी वाईट असलेला काळ अजूनही सुरु आहे आणि पुढची बरीच वर्ष आहे. तीच चूक पुन्हा केलीस तर परत पस्तावशील. तिच्याशी पुनर्विवाहाचा विचार अजिबात करू नकोस. हां, जर तिचा पुढील काळ हा संसारसुखासाठी चांगला असता तर मी तुला अजिबात अडवलं नसतं. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. एकदा फसला आहेस, पुन्हा नको ! ". "ठीक आहे" असं म्हणून प्रशांत गेला. 

साधारण वर्षभराचा काळं लोटला असेल. पुन्हा एकदा प्रशांत अपॉइंटमेंट घेऊन आला. आतातरी ह्याने एखाद्या चांगल्या मुलीशी पुनर्विवाह केला असावा असा मी विचार करत असतानाच, प्रशांत म्हणाला "सॉरी सर". "कशाबद्दल?" मी आश्चर्याने म्हंटलं. प्रशांत म्हणाला "सर मी परत तीच चूक केलीय ! मी माझ्या आधीच्याच बायकोशी पुनर्विवाह केलाय". मी कपाळावर हात मारला "अरे, मी मागच्या वेळेला एवढं सगळं सांगून सुद्धा तू परत तीच घोडचूक केलीस?". प्रशांत "हो सर, मी तिच्या गोड बोलण्याला फसलो आणि परत लग्न करायला तयार झालो. तिने परत त्रास देयला सुरुवात केलीय. आमचं अजिबात पटत नाहीये. रोज नवीन डोकेदुखी असते. मला कंपनीकडून US ला जाण्याचा चान्स आलाय पण मी परदेशात जाऊ नये म्हणून माझ्या बायकोने माझा पासपोर्ट देखील मुद्दामहून गहाळ केलाय, परत तोच सगळा मनस्ताप सुरु झालाय सर. आता पुढे काय?"  मी म्हंटलं " आता काय, परत ये रे माझ्या मागल्या, परत घटस्फोट, परत कोर्टाच्या चकरा, परत मनस्ताप ! ". ह्या वेळेला प्रशांत पुरता कोलमडून गेला होता पण सत्य सांगण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं ! 

ज्योतिषी हा फक्त मार्गदर्शक असतो, पुढे काय वाढून ठेवलंय हे सांगून, 'पुन्हा तीच चूक' न करण्याचा संदेश जातकाला देऊ शकतो पण त्याच नशीब लिहू किंवा बदलू शकत नाही !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com


माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...