साधारण ५५ वर्ष वयाच्या एका Client ने मला दोन प्रश्न विचारले, "माझी नोकरी टिकेल का? आणि मला काही आजार होतील का?" पत्रिकेनुसार याची उत्तरं देउन झाल्यावर त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला कि "या जन्मात मला मुक्ती मिळेल का?" ज्योतिषशास्त्रात मुक्ती मिळेल किंवा नाही यासाठी अनेक नियम दिलेले आहेत जसं अमुक तमुक ग्रहांची युती असेल तर, व्ययेश अमुक तमुक राशीत ह्या ह्या भावात असेल तर वगैरे असे अनेक, पण मी यापैकी कुठलाही नियम न बघता सरळ "नाही" असं उत्तर दिलं ! आता तुम्ही म्हणालं कि असं कसं काहीच न बघता तुम्ही उत्तर दिलत? सांगतो ! 'मुक्ती' ही आध्यात्मिक उन्नतीची शेवटची पायरी, षडरिपु, भौतिकसुखं ह्या सगळ्या पल्याड ती असते, 'जन्म मृत्यु' च्या फेऱ्यातुन सुटका, त्या नंतर पृथ्वीवर कधीच जन्म होत नाही (१% झालाच तरी तो फक्त लोकं कल्याणासाठी होतो). असं असताना नोकरीच्या चिंतेत आणि आजाराची भीती असलेला माणूस हा मुक्तीच्या जवळ 'ह्या जन्मात' तरी पोहोचू शकणार नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे कुठल्याही ज्योतिषाकडे "मला मुक्ती मिळेल का हो?" असा प्रश्न विचारायला गेले नव्हते. मुळात अध्यात्माच्या शेवटच्या पायरीवर असलेला माणूस कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन काहीच विचारणार नाही.
प्रश्नांची उत्तरं देताना ज्योतिषाने तारतम्य ठेवणं देखील आवश्यक आहे. "मी या वर्षी मंगळावर जाईन का? वय वर्ष ४० असताना आता माझी उंची वाढेल का?" या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देताना पत्रिका बघण्याची गरज नसते कारण अशा प्रश्नांची उतरं 'नाही' च असतात.