रविवार सकाळची पहिलीच Appointment !अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळे ती कधी मिळेल हा त्याचा महत्वाचा प्रश्न होता. पत्रिकेनुसार जे काही मुद्दे होते ते सांगून झाल्यानंतर तो म्हणाला "मला आयुष्य भरपूर आहे ना?". पत्रिकेत अल्पायुष्य वगैरे नव्हतं पण माझा प्रश्नाथर्क चेहेरा बघून तो म्हणाला "मला काही आजार वगैरे नाहीये पण माझ्या छंदामुळे हा प्रश्न मी विचारला". असा कुठला छंद आहे जो ह्याला मरणाच्या दारपर्यंत घेउन जाऊ शकतो?
"मी सर्पमित्र आहे" तो म्हणाला, "सापांची मला लहानपणापासुन आवड आणि आता तो मी छंद म्हणून जोपासलाय. कोणाकडे घरात किंवा आवारात साप दिसला कि मला फोन येतो. माझ्या घरातले या छंदामुळे जरा नाराज आहेत पण कोणालातरी सापांना वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल." "Wow Great ! पत्रिकेत तसा काही धोका नसल्यामुळे तुम्ही हा छंद जरूर जोपासा" मी म्हंटल. पुढे तो म्हणाला "आजच सकाळी एक कॉल आला होता. मी तिकडून डायरेक्ट तुमच्याकडेच आलोय; माझ्याकडच्या सॅकमधे एक साप आहे" बाजूच्या सॅककडे बोट दाखवत तो म्हणाला. आतापर्यंत माझं consultation एका सापाच्या साक्षीने सुरु होतं हे ऐकून गंमत वाटली. माझ्या ऑफिस च्या आजुबाजुला बरीच मुंगुसं फिरत असताना मी बघितली आहेत पण सापाच्या उपस्थितीत केललं हे माझं पहिलचं Consultation !