Sunday 29 March 2015

उद्योजकतेच्या जगतात

उद्योजकतेच्या जगतात

अजय आणि धनंजय दोघे एकाच कंपनीत नोकरी करत होते. त्यांचं सगळ सुरळीत चाललं होतं पण दोघांनाही कायम असं वाटायच की, आपण स्वत:चा काहीतरी उद्योगधंदा करावा. त्यासाठी दोघांनीही हळुहळु प्रयत्न सुरु ठेवलेच होते. अशातच, एक दिवशी अजयने नोकरीला रामराम ठोकून स्वत:चा उद्योगधंदा करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला अजयनी अगदी छोटया प्रमाणावर आपला उद्योगधंदा सुरु केला, पण पुढे बघता बघता त्याचा उद्योगधंदा वाढत गेला आणि अगदी थोडया कालावधीतच अजयने उद्योगधंद्यात आपलं शिखर गाठलं. धनंजयला देखील अजयचं हे यश बघून चांगलाच हुरुप आला आणि त्याने देखील नोकरी सोडून उद्योगधंद्यात पाऊल ठेवलं उद्योगधंद्यात पाऊल ठेवल्यापासून थोडेच दिवसात धनंजयला अडचणींनी जणू घेरलंचं 'प्रत्येकाला उद्योगधंदा सुरु करतांना सुरुवातीला अडचणी येतातचं' हा विचार करुन धनंजयने आपला संघर्ष सुरुच ठेवला पण अडचणींचा मारा सुरुच राहिला, पुढे तर कर्जाचे हप्ते थकले, बँकांचा तगादा सुरु झाला ह्या सगळया गोष्टींनी धनंजय चांगलाच त्रस्त झाला आणि त्याने उद्योगधंदा बंद करुन पुन्हा नोकरीकडे आपला मोर्चा वळवला. आश्चर्य म्हणजे धनंजयला पुन्हा चांगल्या पगाराची आणि हुद्याची नोकरी देखील लगेच मिळाली आणि पुन्हा सगळं व्यवस्थित सुरु झालं. ही झाली एक लहानशी गोष्ट. हे अजय आणि धनंजय कुठेही कुठल्याही कंपनीत असू शकतील. तसं पाहिलं तर वयाने, ज्ञानाने, शिक्षणाने आणि कामातल्या कौशल्यात देखील ते जवळजवळ एकाच पातळीवर होते, दोघेही मेहनती, महत्वाकांक्षी आणि जिद्दी होते, मग, फरक कुठे होता? फरक होता तो त्यांच्या नशिबात, एकाचं नशीब 'उद्योगात' तर दुस-याचं 'नोकरीत'.
'मला सध्याची नोकरी कधी बदलता येईल? ' 'मला नोकरीत बढती कधी मिळेल?' किंवा 'मला नोकरी कधी मिळेल?' या सारखे प्रश्न ज्योतिषाला नेहमी विचारले जातात पण त्याचबरोबर 'मी माझी सध्याची नोकरी सोडून एखादा व्यवसाय सुरु करावा का? ', 'कोणता करावा?' हेही प्रश्न विचारणा-या व्यक्तींची संख्या खूप आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रत्रिकेत 'उद्योजकता' आहे का? हे बघावं लागतं, थोडक्यात ती व्यक्ती अजय आहे की धनंजय आहे, हे बघावं लागतं. धंद्याच्या अडचणी विषयी पत्रिका दाखवायला येणा-या लोकांमध्ये, ब-याच लोकांची अडचण असते की, आमचा धंदा 'रोल' होत नाही. धंदा ही काही एकदाच होणारी घटना नाही, तो सातत्याने होणं जरुरीच असतं ह्यालाच धंदा 'चालणं' म्हणतात आणि असा धंदा 'चालण्यासाठी' नशीब लागतच लागतं. त्याशिवाय नुसते प्रयत्न करुन यश मिळत नाही. धंदा 'रोल' होणं किंवा 'चालणं ' हाच धंद्याचा मुळ गाभा आहे हे विसरुन चालणार नाही.
उद्योग/व्यवसाय कधी सुरु होईल? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन गोष्टी बघाव्या लागतात, म्हणजे मुळात त्या व्यक्तिच्या पत्रिकेत उद्योगधंद्याचा योग आहे का? आणि दुसरी म्हणजे महादशा अंतर्दशा उद्योगधंदा कधी दर्शवित आहेत? महादशा अंर्तदशेवर मी मागील एका लेखात माहिती दिली आहेचं. त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती झाली असेलचं. आपण बरेच वेळेला बघतो की, एखादी व्यक्ती बरेच वर्ष नोकरी करत असते आणि नंतर ती उद्योग व्यवसायाला सुरुवात करते आणि यशस्वी होते. हा जो उद्योग व्यवसायाचा काळ आहे, हा या महादशा अंतर्दशेवर अवलंबून असतो तसचं, पुढे किती वर्ष धंदा उत्तम चालेल? कुठली वर्ष उद्योगासाठी विशेष चांगली आहेत? यासाठी देखील महादशा अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो की, काही वेळेला काही व्यक्तिंच्या पत्रिकेत अगदी थोडे दिवसच उद्योग व्यवसाय असतो, तो विशिष्ट काळ उलटून गेला की परत ती व्यक्ती नोकरी करु लागते. उद्योग व्यवसायाच्या बाबतीत काही विचित्र उदाहरणं देखील बघायला मिळतात. एखाद्या व्यक्तीकडे उद्योगासाठी लागणारे सर्व गुण असतात जसं नवीन नवीन कल्पना, मार्केटिंगचे उत्तम कौशल्य वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी असतात. ती व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरी करत असते, त्या व्यक्तीला त्या कंपनीची, त्या उद्योगाची, त्या क्षेत्राची उत्तम जाण असते, अगदी त्या कंपनीच्या मालकापेक्षाही अधिक माहिती असते. मालकाच्या अनुपस्थितीत ती व्यक्ति जणु काही 'प्रती मालक' असल्याप्रमाणे कंपनीतल्या सगळया गोष्टी अगदी उत्तम रितीने हाताळत असते. पण एवढ सगळं असुनही त्या व्यक्तिच्या प्रत्रिकेत उद्योग व्यवसायाचा योग नसतो, नोकरीचाच योग असतो त्या व्यक्तिच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग हा ती व्यक्ति काम करत असलेल्या कंपनीला किंवा त्या कंपनीच्या मालकालाच होणार असतो. अशा व्यक्तिला मला 'वजीर' म्हणावसं वाटतं 'वजीर' हा कदाचित राजापेक्षाही हुशार व ज्ञानी असु शकतो पण तो 'राजा' होऊ शकत नाही.
व्यवसायासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे 'कर्ज' कर्जाशिवाय मोठा व्यवसाय करणे हे आजकालच्या जगात केवळ अश्यकच आहे. कर्जाच्या संर्दभात बरेच मुद्दे उपस्थित होतात जसं 'कर्ज सहजगत्या मिळेल की, बरेच प्रयत्न करावे लागतील?' त्याच प्रमाणे कर्जाची परतफेड व्यवस्थित होईल का?' इत्यादी बाबीही अभ्यासाव्या लागतात धंदा भागीदारीत असल्यास 'कुठल्या भागीदाराने प्रयत्न केल्यास कर्ज सहजगत्या मिळेल?' हाही मुद्दा उपस्थित होतो. तसेच 'नोकर कसे मिळतील? तारक की मारक? हाही प्रश्न थोडा महत्वाचा ठरतो.
काही व्यक्तिच्या पत्रिका ह्या उद्योग धंद्यापेक्षा 'प्रोफेशन' ला चांगल्या असतात जसं चाटर्ड अकौटंट, डॉक्टर, वकील, टॅक्स कन्सलटंट, आर्किटेक्ट वगैरे यालाच आपण 'प्रायव्हेट प्रॅक्टीस' म्हणतो. थोडक्यात काय, तर अशा पत्रिका 'कन्सलटन्सी' क्षेत्राला चांगल्या असतात.
ज्या व्यक्तिंच्या नशिबात उद्योग व्यवसाय असतो ती व्यक्ति आपोआपच उद्योग व्यवसायात खेचली जाते. याबाबतीत आपल्याला अशीही उदाहरण बघायला मिळतील की अमुक अमुक व्यक्तीला नोकरी करायची होती त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले पण चांगली किंवा मनासारखी नोकरी मिळाली नाही किंवा नोकरीच मिळाली नाही म्हणून मग एखादा उद्योग सुरु केला आणि त्या व्यवसायात त्या व्यक्तिची खूप भरभराट झाली. काही वेळेला एखाद्या व्यक्तिच्या चांगल्या चालू असलेल्या नोकरीत अचानक अडचणी उत्पन्न होतात, नोकरी जाते आणि मग ती व्यक्ति एखादा उद्योग व्यवसाय सुरु करते आणि पुढे त्यात भरभराट होते.
तर, अशा या उद्योजकतेच्या विविध छटा. उद्योजकतेच्या जगतात शिरण्यापूर्वी नशिबाची साथ तपासून बघणं महत्त्वाचं ठरतं आणि ती जर असेल तर मग चला 'उद्योजकतेच्या जगतात'.


अभय गोडसे


No comments:

Post a Comment

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...