प्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनीलची पत्रिका 'सीए होणार' हे ठळकपणे दर्शवित होती. सहा महिन्यानंतरचा काळ पास होण्यासाठी खूप चांगला होता म्हणून मी त्याला त्या काळात परीक्षा द्यायला सांगितलं आणि सहा महिन्यांनी सुनील नुसताच पास नाही तर चांगल्या मार्कांनी सीए झाला. सुनील म्हणाला, "सर, मी आज फक्त तुमच्यामुळेच सीए होऊ शकलो" !
प्रसंग २ : अमितच लग्न होऊन २ वर्ष झाली होती पण बायकोशी अजिबात पटत नव्हतं. रोजच्या भांडणाला कंटाळून तो माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला होता. दोघांच्याही पत्रिका 'घटस्फोट होणार' हे स्पष्टपणे दाखवत होत्या त्यामुळे त्याला तसं स्पष्टपणे सांगावंच लागलं. अमित खूप निराश झाला आणि म्हणाला कि सर मला तुमच्याकडून सगळंच निगेटिव्ह ऐकायला मिळालं. तुम्ही काहीतरी पॉसिटीव्ह सांगाल असं वाटलं होतं.
वरील दोन्ही प्रसंग जरी वेगळे असले तरी त्यातून हे कळतंय कि यशाचे श्रेय किंवा अपयशाचं दूषण हे ज्योतिषालाच दिलं जातं. माझ्यामते हे दोन्हीही चुकीचंच आहे. ज्योतिषी हा कधीच तुमचं यश किंवा अपयश ठरवतं नाही, तो फक्त आणि फक्त पत्रिकेत काय आहे एवढंच सांगू शकतो, तुमचं नशीब तो ठरवत नाही, किंबहुना ठरवूच शकत नाही. जर तुमचं नशीब तो ठरवू शकत असता तर ज्योतिषाने पहिल्यांदा स्वतःच नशीब बदलून घेतलं असतं. आपलं नशीब हे आपल्या प्रारब्धामुळेच असतं तेंव्हा त्यासाठी ज्योतिषाला दूषण किंवा श्रेय देण्याचं काहीच कारण नाही. हां, उपायांच्यामुळे वाईट गोष्टींची तीव्रता कमी होऊ शकते हे बरोबर आहे पण ज्या गोष्टी मूळ पत्रिकेतच नाहीत त्या उपाय करून आणता येत नाहीत.
पत्रिकेत वाईट गोष्टी असताना ज्योतिषाने तुम्हाला बरं वाटण्यासाठी कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरीही वाईट असेल तर वाईटच होणार, तात्पुरते तुम्ही खुश व्हाल पण पुढे घडायचं ते घडणारच आहे. पत्रिकेत वाईट गोष्टी असताना सुद्धा काही ज्योतिषी समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून फक्त चांगलंच सांगतात, ही फक्त वरवरची मलमपट्टी होते, फार काळ जातकाला (ज्याची पत्रिका आहे तो) ह्याचा उपयोग होत नाही, कधी ना कधी सत्याला सामोरं जावंच लागतं. इथे ज्योतिषी आणि जातक दोघांचीही चूक असते. काही जातकांची, 'आपल्याला चांगलं भविष्य सांगेल तो "चांगला" ज्योतिषी', अशी बालीश विचारसरणी असते, हा शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. चांगलं किंवा वाईट ह्यापेक्षा "खरं" भविष्य सांगेल तो चांगला ज्योतिषी, असं म्हणणं योग्य आहे. काही जातक एखाद्या ज्योतिषाचा संदर्भ दुसऱ्याला देताना देखील "ते 'चांगलं' सांगतात, त्यांच्याकडे जा" असं सांगतात, ह्यापेक्षा "ते 'खरं' सांगतात, त्यांच्याकडे जा, असं सांगणं अभिप्रेत आहे.
ज्योतिषी हा एखाद्या पोस्टमनसारखा असतो. तुमच्या नशिबाचे किंवा प्रारब्धाचे निरोप पोहोचवणारा दूत ! त्याला निरोप लिहिण्याचा किंवा ते बदलण्याचा अधिकार नाही, फक्त ते निरोप चांगल्या रीतीने आणि वेळेत जातकापर्यंत पोहोचवणे एवढंच त्याच काम !
एखाद्या ज्योतिषाचे आभार मानणं किंवा त्याला थँक्यू म्हणणं ठीक आहे पण खरे आभार देवाचे माना कि त्याने तुमचं 'खरं' भविष्य सांगण्याची शक्ती त्या ज्योतिषाला दिली, कारण शेवटी कुठलाही ज्योतिषी हा असतो फक्त तुमच्या "प्रारब्धाचा पोस्टमन" !
अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
No comments:
Post a Comment