Friday, 18 November 2022

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा...

2018 मधे आमचे एक फॅमिली फ्रेंड आमच्या घरी भेटायला आले होते. त्यांच्याबरोबर त्यांची आठवीत शिकणारी मुलगी देखील आली होती. गप्पांच्या ओघात त्यांच्या मुलीच्या चेहेऱ्यावरच्या हावभावांचं मी निरीक्षण करायला लागलो. तिची बोलण्याची ढब, हावभाव ह्या गोष्टीं बघितल्यावर तिची पत्रिका काय असेल ह्याचा मी विचार करू लागलो (मी तिची पत्रिका त्याआधी कधीही बघितली नव्हती) आणि अचानक माझ्या असं लक्षात आलं कि ह्या मुलीचं लवकरच affair होणार आहे आणि तो choice फारच वाईट असणार आहे. ती वेळ हे सगळं बोलायची नव्हती म्हणून काही दिवसांनी हि गोष्ट मी तिच्या आईवडिलांच्या कानावर घातली. वडिलांची reaction फारच casual होती, "आमची मुलगी आम्हाला सगळं सांगते, तसा काहीच problem नाहीये वगैरे", असा सुर होता पण आईने जरा गांभीर्याने घेतलं होतं. मी माझं काम केलं होत, माझ्यासाठी तो विषय तिथेच संपला.

मधे दोन वर्ष निघून गेली आणि अचानक मुलीच्या आईचा एके दिवशी मला फोन आला. सुर खूप चिंतेचा वाटतं होता, "तुम्हाला मुलीची पत्रिका दाखवायचीय, जरा बोलायचय", असं म्हंटल्यावर मी काय समजायचं ते समजलो.

Consultation च्या वेळेला मुलीच्या आईने सगळं खरं सांगायला सुरुवात केली, "मुलीचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीये, एका मुलाच्या प्रेमात पडलीय, तो मुलगा अत्यंत खालच्या दर्जाचा आहे. तुम्ही पूर्वी सांगितलं होतं म्हणून मी alert होते, आम्हाला संशय आल्यावर, आम्ही तिला खोदून खोदून विचारल्यावर तिने आता सगळं आम्हाला सांगितलंय. आता पुढे काय?". मी पत्रिका बघून "हे लग्न होणारं नाहीये, affair break होईल, पण शारीरिक संबंध येऊ शकतील, त्याबाबत काळजी घ्या, हे शेवटचं affair नाहीये, पुढेही होणार आहेत, या आणि अशा अनेक गोष्टीं सांगितल्या. काय करा, कसं वागा, काय काळजी घ्यावी, त्याबद्दल देखील सांगितलं.

काही गोष्टीं पत्रिका बघून कळतात आणि काही गोष्टीं पत्रिका बघायच्या आधीच कळतात, त्यापैकीच हा एक किस्सा. आणखी असे काही अनुभव आहेत, त्याविषयीं सुद्धा जसा वेळ मिळेल तसं लिहिनचं 😊

धन्यवाद 🙏
Astrologer Abhay Godse.
My website www.KPJyotish.com

तळटीप: हा लेख copy paste करायचा झाल्यास कृपया माझ्या नावासकटचं करावा 😊

Tuesday, 25 August 2020

Astrological Counselling

 


Counsellor may not be an Astrologer but an Astrologer should be also a good counsellor.

Though, prediction is a technical part, conveying prediction to the client should be in the form of counselling.


Few months back, One Client came to me for consultation who was totally Depressed & was having SUICIDAL thoughts as well. His horoscope was NOT showing Short Life at all. Still, I did some counselling to him & he felt better. This week, during phone consultation, he told me that he cracked some BIG deal & got some BIG order for his company. I could feel the happiness in his voice.


Astrologer Abhay Godse
Appointment Booking online,



Sunday, 9 August 2020

पत्रिका आणि Sports


आज सकाळी California ला consultation होतं. 11 वर्षाच्या मुलाच्या पालकांचा प्रश्न होता कि आमच्या मुलाला स्पोर्ट्स मधे यश आहे का? मुलाच्या पत्रिकेत 2029 पर्यंतचे आणि त्यानंतरचे काळ देखील स्पोर्ट्स साठी खूप चांगले होते. अवॉर्ड्स, achivements ह्या सगळ्या गोष्टी पत्रिकेत दिसत होत्या त्यामुळे नक्की त्याला प्रोत्साहन द्याचं असं मी सांगितलं. तसंच, त्याच्या पत्रिकेत तो मैदानी खेळ खेळेल असंही दिसत होतं. (म्हणजे बैठे खेळ जसं chess, कॅरम तो खेळेल असं दिसत नव्हतं). हे सगळं जरी उत्तम दाखवतं होतं तरी हा  मुलगा त्याच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे ग्रुपमधे adjust होऊ शकणार नाही असं पत्रिका दाखवतं होती. म्हणजेच ग्रुपमधे खेळले जाणारे खेळ जसं क्रिकेट वगैरे हा खेळू शकणार नाही हे स्पष्ट होतं.


हा मुलगा टेबल टेनिस आणि लॉन टेनिस खेळत होता, जे match होतं होतं पण पत्रिकेनुसार ह्याचा स्वभाव अहंकारी, हट्टी दाखवतं असल्यामुळे हा मुलगा doubles खेळताना सह-खेळाडूला co-operate करणार नाही, हे हि मी सांगितलं. पालकांनी लगेच मान्य करत हा नेहमी Singles च खेळतो, असंही  सांगितलं. काही काही पत्रिका किती आणि कुठले कुठले details दाखवू शकतात ह्याचच हे एक उदाहरणं.

Astrologer अभय गोडसे 
For Consultation, Appointment Booking online,



Thursday, 16 April 2020

मी कुत्रा पाळू का?

ज्योतिषाला कोण कधी कुठला प्रश्न विचारेल हे सांगणं कठीण असतं. काल एका क्लायंट ने "मी कुत्रा पाळू का?" असा प्रश्न विचारला.


अर्थातच माझी पहिली प्रतिक्रिया होती कि "ह्यात ज्योतिषाला काय विचारायचंय? तुम्हाला पाळायचाय तर पाळा". त्यावर तो म्हणाला "तसं नाही, घरी माझी एक वर्षांची लहान मुलगी, बायको आणि वयस्कर आईवडील आहेत, त्यांना पाळीव प्राण्यामुळे काही आजार नाही ना होणार?" हां, आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं होतं. साहजिकच तुमच्या मनात प्रश्न उभा राहील कि कुत्र्यापासून आजार होईल का? हे पत्रिकेवरून कसं सांगणार? सांगतो !

पाळीव प्राण्यांमुळे विशेषतः कुत्रा आणि मांजरीमुळे (त्यांच्या केसांमुळे) अस्थमा तसेच इतर श्वसनाचे आजार उदभवू शकतात. "आरोग्य आणि ज्योतिष" ह्या माझ्या व्हिडीओ मधे (लेखाच्या खाली व्हिडिओची लिंक दिलीय), मी जसं म्हटलंय कि आपल्या पत्रिकेत लग्नरास चंद्ररास शरीराच्या ज्या भागावर येते त्या भागाचे आजार होण्याची शक्यता नेहमी जास्त असते. श्वसनाचे आजार हे ENT आणि Chest ह्या भागाचे असल्यामुळे हे भाग वृषभ, मिथुन आणि कर्क राशींच्या अमलाखाली येतात त्यामुळे ज्यांची लग्नरास किंवा चंद्ररास वृषभ, मिथुन किंवा कर्क असते त्यांनी विशेष काळजी घ्यावी. जेंव्हा हा क्लायंट, त्याची बायको आणि 1 वर्षाची मुलगी ह्याच्या पत्रिका मी बघितल्या तेंव्हा खालील गोष्टी लक्षात आल्या. (वयस्कर आईवडलांची जन्म तारीख, वेळ माहित नसल्यामुळे त्यांच्या पत्रिका बघता आल्या नाहीत)

नवरा: धनु लग्न, कुंभ रास 
बायको: मेष लग्न, वृषभ रास
मुलगी: कर्क लग्न, कर्क रास 

ह्यामधे बायको आणि मुलगी हयांच्या पत्रिकेत वृषभ आणि कर्क राशींचा संबंध आहे. विशेषतः मुलीच्या पत्रिकेत कारण तिची लग्नरास आणि चंद्ररास दोन्ही कर्कच आहे त्यामुळे त्या दोघींना आणि विशेषतः लहान मुलीला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्याने कुत्रा पाळल्यास ह्या दोघींच्या आरोग्यची जास्त काळजी घ्यावी असं सांगितलं. 

यापुढे जाऊन, त्यांनी जर कुत्रा पाळला तर ती कुत्री (Female Dog) असेल आणि खूप प्रेमळ, cute (फोटोत दिसतेय तशी) असेल असं सांगितलं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय सांगितलंत? ह्या क्लाएंटची शुक्र महादशा सुरु आहे आणि शुक्र मीनेत आहे. शुक्र स्त्री ग्रह आहे आणि तो मीनेसारख्या अत्यंत सॉफ्ट आणि प्रेमळ राशीत आहे, शुक्र मीनेत उच्चीचा होतो हे आणखी चांगलं.

हा अनुभव सांगण्याचं कारण असं कि काही गोष्टी ह्या ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकात जरी दिलेल्या नसल्या तरी त्या मागचं Logic/ तर्क जर जाणून घेतला तर कुठल्याही गोष्टींचं उत्तर देणं सोपं होतं.

वर वर हास्यपद वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षात किती तर्कशुद्ध देता येतं याचच हे एक उदाहरण!

'आरोग्य आणि ज्योतिष' व्हिडिओ 

Astrologer अभय गोडसे 
Book Appointment online,

Friday, 20 December 2019

पत्रिका बोलते..

माणूस ज्योतिषाकडे गेल्यावर ज्योतिषी पत्रिका बघून भविष्य सांगतो हे तर सगळ्यांनाच माहित आहे पण काही वेळेला पत्रिकाच ज्योतिषाला भविष्य सांगते किंवा काही गोष्टी सांगायला भाग पाडते. आता तुम्ही म्हणाल कि हे असं कसं? खालील काही उदाहरणांवरून/प्रसंगांवरून तुमच्या लक्षात येईल कसं ते.

प्रसंग एक: 
एका जातकाची पत्रिका (जातक म्हणजे ज्याची पत्रिका बघत आहात तो) करिअरच्या प्रश्नांसाठी बघत होतो. करिअर संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाली आणि अपॉइंटमेंट संपणार इतक्यात मला त्याच्या पत्रिकेत त्याच्या आरोग्याविषयी एक पॉईंट highlight झाला जणू काही पत्रिका मला सांगते आहे कि हा मुद्दा त्याला सांग. तो मुद्दा म्हणजे त्या माणसाला पोट आणि ओटीपोट संदर्भातले आजार होतील, म्हणून त्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. हा मुद्दा मी त्याला सांगितल्यावर तो जातक म्हणाला कि मला heavy डायबिटीस आहे आणि मी already इन्सुलिनवर आहे. खरं म्हणजे अपॉइंटमेंटच्या वेळेला त्याने health front घेतली नसल्यामुळे मी ती चेक केलीच नव्हती पण पत्रिकेनेच मला ती front दाखवली किंवा सांगायला लावली.

प्रसंग दोन:
एका बाईची पत्रिका आरोग्याविषयीच्या प्रश्नांसाठी बघत होतो. त्या संदर्भात उत्तरं देऊन झाल्यानंतर मी पत्रिका खाली ठेवायला पाहिजे होती पण त्याच वेळेला तिची पत्रिका माझं लक्ष दशम स्थानाकडे (करिअरच स्थान) द्येयला सांगत आहे असं मला वाटलं आणि काहीही कारण नसताना त्या स्थानातले ग्रह आणि महादशा बघून मी तिला सांगितलं कि इथून पुढे तुम्ही जरी नोकरी सोडण्याचा विचार केलात तरी तसं होणार नाहीये, तुमच्या पत्रिकेत बरीच वर्ष नोकरी होण्याचाच योग आहे. ह्यावर ती बाई लगेच म्हणाली कि, "हो माझा असा विचार बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे पण नोकरी सोडायला गेले कि काही ना काही कारण येतं आणि नोकरी सोडता येत नाहीये." त्या बाईच्या न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पत्रिकेने दिलं होतं.

प्रसंग तीन:
एका व्यक्तीची Career Front बघतं होतो. प्रश्नांची उत्तर देऊन झाल्यावर पत्रिकेत माझं लक्ष 'कायमचं वास्तव्य' म्हणजेच permanent stay कुठे होईल? ह्या मुद्दाकडे गेलं किंवा पत्रिकेने ते नेलं असं म्हणता येईल. जातकाचा कुठलाही तसा प्रश्न नसताना मी "तुमचं कायमचं वास्तव्य 'पुण्यातच' होईल, बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी परत पुण्यातच यावं लागेल असं सांगितलं." हे सांगितल्यावर तो म्हणाला कि, "काही वर्षांपूर्वी मी बाहेरगावी स्थलांतरित होण्यासाठी गेलो होतो पण काही कारणामुळे परत पुण्यातच आलो आणि आता स्थायिक झालोय". त्याचा हा प्रश्न नव्हता पण तरीही त्याच्या पत्रिकेने त्याला हा मेसेज दिला होता.

(असे बरेच प्रसंग आहेत पण लेखाचा मुद्दा समजायला इतके पुरेसे आहेत म्हणून सध्या इतकेच लिहीत आहे.)

ज्योतिषी पत्रिका बघतो हे तर झालंच पण काही पत्रिकाच काही मुद्दे जातकापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्योतिषाला सांगतात किंवा भाग पाडतात आणि मग जातकाचा प्रश्न असो किंवा नसो, ते मुद्दे ज्योतिषी स्वतःच सांगतो. ह्यालाच ज्योतिषाच्या भाषेत "पत्रिका बोलते" असं म्हंटल जातं. जशी काही माणसं खूप बोलकी आणि काही माणसं खूप अबोल असतात अगदी तसंच काही पत्रिका खूप बोलतात आणि काही पत्रिका बोलत नाहीत. जेंव्हा पत्रिका बोलतात तेंव्हा ज्योतिषाकडे खूप मुद्दे सांगण्यासाठी असतात आणि बोलत नाहीत तेंव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. 

कदाचित तुम्ही खूप बोलके असाल पण तुमची पत्रिका बोलकी आहे का? ते कळेल ज्योतिषाकडे गेल्यावर 😊
 
अभय गोडसे, 
For Consultation, Visit 
KPJyotish.com
AbhayGodse.com

Saturday, 14 December 2019

पोलीस ऑफिसर कि टीचर?

एक मुलगा पोलीस ऑफिसर होण्यासाठी तीन वर्ष सतत  प्रयत्न करत होता पण यश येत नव्हतं त्यामुळे पुढे प्रयत्न सुरु ठेवावे कि दुसरं काही करावं अशा द्विधा मनस्थितीत तो होता. ज्योतिषशास्त्रीय दृष्टया काही उत्तर मिळतय का ते बघण्यासाठी म्हणून माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला. त्याची पत्रिका बघितल्यावर असं लक्षात आलं कि त्याच्या पत्रिकेत Teaching/Lecturship चे योग आहेत. गव्हर्नमेंट जॉब किंवा पोलीस खातं ह्यामधे नोकरीच होणार नाहीये. मी हे त्याला सांगितल्यावर तो म्हणाला कि 3 वर्षांपूर्वी मी lectureship च करत होतो आणि ते सोडून मी आता पोलीस ऑफिसर होण्यासाठी परीक्षा देतोय. मी म्हंटल "हेच नेमकं तुमचं चुकलं, परत lectureship कडे वळा म्हणजे तुमची आर्थिक गाडी परत रुळावर येईल. आपण केलेली चूक आणि फुकट गेलेला वेळ 
त्याच्या लक्षात आला आणि आता तो परत lectureship कडे वळलाय !

20th Aug 1992, 09.58, Satana, Maharashtra
अभय गोडसे, 
For Consultation, Visit KPJyotish.com
AbhayGodse.com
 
 

Friday, 15 November 2019

भामटा


एक व्यक्ती (स्वतःला ज्योतिष अभ्यासक म्हणवणारी) पत्रिका दाखवायला आली. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या होत्या त्यामुळे माझ्या ज्योतिष ज्ञानाबद्दल त्यांची खात्री पटली. Consultation दरम्यान माझ्या असं लक्षात आलं कि ते स्वतःला अभ्यासक म्हणवत असले तरी त्यांचं ज्ञान अगदीच थातूर मातुर आहे.

स्वतःचं विचारून झाल्यानंतर त्यांनी दुसरी एक पत्रिका माझ्यासमोर ठेवली जी एका मोठ्या नावाजलेल्या मंत्र्याची होती. निवडणूका जवळ आल्या होत्या. हे मंत्री त्यांचे घनिष्ठ मित्र आहेत असा दावा करत "ह्या निवडणुकीत त्यांना यश मिळेल का?" असा त्यांनी मला प्रश्न केला. मी त्यांना म्हंटल कि "पहिली गोष्ट, त्यांना (त्या मंत्र्याला) माझा reference द्या आणि त्यांना त्यांचं भविष्य जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर त्यांना मला consultation द्येयला जरूर आवडेल & it will be an honor for me". ह्यावर मात्र ती व्यक्ती "तुम्ही मला सांगा आणि मी तुमच भाकीत त्यांना नक्की सांगतो" ह्या मुद्यावर अडून बसली. मी त्यांना म्हंटल कि तुम्ही स्वतः ज्योतिष अभ्यासक आहात, तुम्ही मला तुमचं reading सांगा आणि आपण ज्योतिष नियमानुसार ह्या पत्रिकेवर चर्चा करू. ह्या गोष्टीला देखील ती व्यक्ती तयार होईना, फक्त भाकीत सांगा, ह्यावरच सगळा भर ! आता ह्या व्यक्तीचा प्लॅन माझ्या लक्षात आला, त्या व्यक्तीला मी सांगितलेलं भविष्य हे स्वतःच्या नावावर मंत्र्याला सांगून भाव खायचा होता. त्या व्यक्तीची पत्रिका मी नुकतीच बघितली असल्यामुळे ती व्यक्ती हे असं करूच शकते हे समजायला मला जास्ती वेळ लागला नाही. त्यामुळे मी त्या मंत्र्याच भविष्य त्यांना सांगितलंच नाही हे वेगळं सांगायला नको. मुद्दा हा कि अशा व्यक्तींपासून व्यावसायिक ज्योतिषांनी सावध राहावे. सगळेच 'ज्योतिष अभ्यासक' भामटे नसतात पण काही भामटे हे 'ज्योतिष अभ्यासक' बनून येतात, म्हणून सावधान !

अभय गोडसे, 
For Appointment, Visit KPJyotish.com
AbhayGodse.com

Monday, 4 November 2019

ज्योतिष आणि दैवी मार्गदर्शन

ज्योतिष मार्गदर्शन हे दैवी मदतीशिवाय अपूर्ण असतं. ज्योतिष हा काही फक्त आकड्यांचा किंवा नुसत्या राशींचा खेळ नव्हे. अचूक मार्गदर्शन हे दैवी मदतीनेच शक्य होतं. हे दैवी संकेत कसेही मिळू शकतात. एखादा विचार त्याच वेळेस प्रकर्षाने जाणवणे, एखादी action काहीतरी सांगून जाते. असेच दैवी मदतीचे मला आलेले काही अनुभव इथे सांगतोय, जरूर वाचा.

#1
दोन वेळा घटस्फोट झालेल्यांच्या पत्रिका मला एका ग्रुपवर टाकायच्या होत्या. अशा एका क्लायंटच नाव त्याचे birth details सॉफ्टवेअरमधे शोधण्यासाठी हवं होतं पण काही केल्या ते नाव मला आठवत नव्हतं. एक तास झाला.. दीड तास झाला.. तरी नाव आठवेना.. विचार करून त्रास व्हायला लागला आणि तेव्हढ्यात माझ्या मोबाईलवर एक कॉल आला, एक रिंग वाजली आणि कट झाला. फोन उचलून बघितलं तर truecaller ने एक नाव दाखवलं आणि आश्चर्य  म्हणजे हे तेच नाव होतं जे मी मघाच पासून आठवण्याचा प्रयत्न करत होतो. विशेष म्हणजे त्या नंबर वरून मला परत फोन आला नाही आणि आडनाव जरी सारखं असलं तरी तो त्या क्लायंट चा नंबर नव्हता.

#2
एका आयुर्वेदिक डॉक्टरची पत्रिका बघत होतो. मुलं होण्याविषयी प्रश्न होता. त्या संबंधात उत्तरं देऊन झाली आणि ज्योतिष नियमानुसार असं लक्षात आलं कि ह्या बाईचा अन्नाविषयी (चुकीच्या खाण्याविषयी) काहीतरी प्रॉब्लेम आहे. तशी कल्पनाही मी त्यांना दिली पण तरीही exactly काय प्रॉब्लेम्स आहे हे कळत नव्हतं. दोन मिनिटं गेल्यावर अचानक माझ्या डोक्यात हजार वॅटचे ब्लब लागले आणि असं प्रकर्षाने जाणवलं कि गोड पदार्थांविषयी काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या स्वतः डॉक्टर असून सुद्धा मी त्यांना 'गोड जास्ती खाऊ नका त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार आहेत' असं सांगितलं,  त्यावर त्या लगेच म्हणाल्या "हो, मी गोड खूप खाते पण आता कमी करेन"

#3
लग्नाचं स्थळ..
आता हा किस्सा ज्योतिष मार्गदर्शनाच्या वेळचा नसून माझ्या  स्वतःच्या लग्नासाठी मुली बघतानाचा आहे. एक स्थळ आलं, मुलीचं दिसणं, शिक्षण, नोकरी ह्या सगळया गोष्टीत नावं ठेवायला जागा नव्हती, सगळं व्यवस्थित. मुलीला पहिल्यांदा भेटलो, नेहमीप्रमाणे चहा पोह्याचा कार्यक्रम सुरु होता, सगळं ठीक वाटतं होतं. चहा पिऊन झाल्यावर त्या मुलीने कपबशी टीपॉयवर ठेवली आणि तिची ती action बघून मला एकदम प्रकर्षाने Negativity जाणवली आणि असं वाटलं कि हि  मुलगी Liability होणार ! तिच्या actions मधे practically बघता काहीच दोष नव्हता तरीही काहीतरी प्रकर्षाने निगेटिव्ह जाणवलं पण काय ते माहित नव्हतं.  आईबाबांची पुढे जायची तयारी होती पण शेवटी मी नकार दिला. हि घटना घडून साधारण एक दीड वर्ष झालं असेल, एके दिवशी त्या मुलीचा फोटो आम्हाला वर्तमानपत्रातल्या 'निधन वार्ता' सदरात दिसला आणि आम्ही उडालो.. blood cancer मुळे त्या मुलीचं निधन झालं होतं. समजा लग्न केलं असतं तर?

#4
'ग' अक्षराचा डॉक्टर..
क्लायंटच्या health problem संदर्भात पत्रिका बघत होतो. पत्रिका बघताना असं लक्षात आलं कि ह्याला 'ग' ह्या अक्षराने नावं सुरु होण्याऱ्या डॉक्टरचा उपयोग जास्त होणार आहे. मी त्यांना तसं सांगितलं आणि नावांच उदाहरणं देताना 'गणेश' हे नावं त्या वेळेला माझ्या डोक्यात प्रकर्षाने आलं म्हणून ते सांगितलं. त्यावर त्याला आश्चर्य वाटलं कारण 'गणेश' नावाच्याच डॉक्टरची ट्रीटमेंट तो पूर्वी घेत होता पण काही कारणाने ती थांबवावी लागली होती, ती लगेच पुन्हा सुरु करा असं मी सांगितलं.

#5
इस्टेट..
"मला वडिलोपार्जित इस्टेट मिळेल का?" असा एका क्लायंटचा प्रश्न बघत होतो. त्याच्या पत्रिकेत वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे संकेत होते पण पूर्ण हक्क मिळेल असं दिसत नव्हतं म्हणून मी म्हंटल कि हि संपत्ती मिळण्यात काही अडचण आहे का? असं विचारल्यावर त्याने भावाची पत्रिका समोर ठेवली. त्या पत्रिकेविषयी बोलत असताना एकदम मी म्हंटल कि तुमच्या भावाला तुमचा हिस्सा द्येयचा नाहीये कारण तो म्हणतोय मी आईवडिलांच सगळं केलंय आणि बाहेरगावी बसलेल्या तुम्हाला काय म्हणून हिस्सा द्येयचा. हे माझं वाक्य ऐकून तो क्लायंट म्हणाला "अहो तो खरंच अगदी असंच म्हणतोय." हे वाक्य त्या वेळेला मला सुचलं किंवा प्रकर्षाने जाणवलं असं म्हणता येईल.

#6
एक मुलगी पहिल्यांदाच माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन आली आणि मी पत्रिका बघण्याच्या आधीच तिने तिची रिलेशनशिप कशी ब्रेक झाली ते सांगायला सुरुवात केली. ते ऐकून झाल्यावर मी म्हंटल "पण, हि तुमची पहिली रिलेशनशिप नाही आणि शेवटची पण नाही, त्यामुळे इथून पुढे सुद्धा तुमची परत एकदा रिलेशनशिप होणार आहे". हे ऐकून ती म्हणाली "हे सगळं खरं आहे पण तुम्हाला हे पत्रिका न बघताच कसं कळलं?" त्या मुलीला बघून तिचा शुक्र बिघडलेला आहे अशी जाणीव झाली आणि म्हणून मी ते बोललो होतो.

अभय गोडसे,
For Appointment, Visit
KPJyotish.com
AbhayGodse.com

Thursday, 22 August 2019

सॉफ्टवेअर आणि उदबत्ती !

#Know_the_Facts_than_Fantasies
www.KPJyotish.com



2017 साली West Bengal मधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने त्याच्या करियरसाठी कन्सल्ट केलं. Software  field मधली नोकरी सोडून व्यवसाय करता येईल का? दुर्दैवाने ह्या त्याच्या प्रश्नाच उत्तर पत्रिकेत नकारार्थी होतं. त्याची साडेसाती देखील सुरु होणार होती त्यामुळे करियर मधे अडचणी (Job changes, Job less patches) येणार आहेत असा रेड अलर्ट देखील मी दिला. एवढं सांगून सुद्धा ह्या माणसाने  2018 मधे नोकरी सोडून उदबत्ती उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय अजिबात चालला नाही,  व्यवसायात घातलेले पैसे बुडले आणि आता 2019 मधे परत नोकरीकडे वळण्याची वेळ आलीय.

कृष्णमूर्ती पद्धतीच्या ज्योतिष अभ्यासकांसाठी पत्रिका खाली देत आहे.
23rd Oct 1974, 17.02,  Kolkata 


ह्या पत्रिकेत दशमाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र हा दशमाचा बलवान कार्येश असून सप्तमाचा कार्येश होत नाही तसेच महादशास्वामी गुरु हा देखील सप्तमाचा बलवान कार्येश नाही. त्यामुळे नोकरी हा एकमेव मिळकतीचा स्रोत पुढे सुद्धा राहील. साडेसातीत बरेच वेळेला विनाशकाले विपरीत बुद्धी असा अनुभव येतो, चुकीचे निर्णय हेच अंत्यंत बरोबर वाटतात. तसा प्रकार इथे झाला.

आता इथे आणखी एक प्रश्न उभा रहातो कि ह्याने उदबत्तीचाच व्यवसाय का सुरु केला? जर तुमचं लक्ष सध्या (2018/2019 साल) सुरु असलेल्या अंतर्दशेकडे गेलं असेल तर कळेल कि शुक्राची अंतर्दशा सुरु आहे. शुक्र हा स्वराशीत (तुळेत) सप्तमात आहे. शुक्र हा सुवास, सुंगधी द्रवै ह्यांचा कार्येश आहे त्यामुळे त्याला ह्या अंतर्दशेत शुक्रा संबंधिच व्यवसाय करण्याची बुद्धी झाली.

अभय गोडसे,
For Consultation,  visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com 


Thursday, 8 August 2019

तुझं लग्न होणारच !

Know the Facts than Fantasies
www.KPJyotish.com

2014 सालात एका काश्मिरी मुलाने करियरसाठी कन्सल्ट केलं. त्यानंतर त्यानी विचारलं कि माझ्या पत्रिकेत लग्न आहे का? माझ्या होकारार्थी उत्तराने तो गोंधळला आणि म्हणाला कि मला तर लग्नच करायचं नाहीये तर मग पत्रिकेत असलं तरी होणार कसं? मी तर करणारच नाही. मी म्हंटल कि जेव्हा तुझ्या नशिबात लग्न आहे पण तुला करायचं नाहीये याचा अर्थ असा कि जेव्हा लग्नासाठीचा काळ येईल तेंव्हा काहीना काही कारणाने तू लग्नाला होकार देशीलच. त्यावेळी मी सांगितलेल त्याला जरी पटलं नसलं तरी 2019 मधे जेव्हा हाच (लग्न न करण्यावर ठाम असलेला) मुलगा त्याच्या बायकोच्या करियरविषयी माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला तेंव्हा "तुझं कसं काय लग्न झालं बाबा?" ह्या माझ्या प्रश्नावर त्याच्याकडे स्मितहास्य करण्याशिवाय काही उत्तर नव्हतं.

ज्योतिष अभ्यासकांसाठी पत्रिकेचं विश्लेषण खाली देत आहे..
अर्जुन,  2nd Sept 1985,  21.55,  Akhnoor, Jammu


लग्न होण्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी 2, 7, 11 ह्यापैकी एकातरी स्थानाचा कार्येश हवा.  ह्या पत्रिकेत सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी शनी हा 7, 11 चा कार्येश होतो,  त्यामुळे लग्न होणार आहे. त्याचबरोबर महादशा स्वामीची देखील साथ बघणं महत्वाचं आहे. शुक्र महादशा 2020 पर्यंत आहे. महादशास्वामी शुक्र हा 2, 7, 11 या तीनही स्थानांचा कार्येश आहे त्यात सुद्धा 2 आणि 7 ह्या भावात ग्रह नसल्यामुळे त्यांचा बलवान कार्येश आहे,  त्यामुळे लग्न हे ह्याच महादशेत होणार. शनी हा विरक्तीचा कार्येश आहे. ह्या पत्रिकेत शनी हा प्रथम तसेच सप्तमाचाही कार्येश आहे आणि सप्तमातच उच्चीचा आहे त्यामुळे ह्या मुलाला लग्न करण्याची इच्छाच नव्हती तरीपण पत्रिकेत लग्न होतंच. आता शुक्र महादशेतल्या कुठल्या अंतर्दशेत लग्न होणार हा प्रश्न उभा राहतो. हा मुलगा जेव्हा consultation साठी आला तेंव्हा शनीचीच अंतर्दशा सुरु होती जी 7 आणि 11 ची बलवान कार्येश आहे. ह्या मुलाचं लग्न शनी अंतर्दशेतच 2016 मधेच झालं.

अभय गोडसे,
For Consultation,  visit www.KPJyotish.com or www.AbhayGodse.com

Friday, 12 July 2019

Consultation - सापाच्या साक्षीने..



रविवार सकाळची पहिलीच Appointment !अरुण माझ्याकडे करियरविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आला होता. त्याला त्यावेळेला नोकरी नसल्यामुळे ती कधी मिळेल हा त्याचा महत्वाचा प्रश्न होता. पत्रिकेनुसार जे काही मुद्दे होते ते सांगून झाल्यानंतर तो म्हणाला "मला आयुष्य भरपूर आहे ना?". पत्रिकेत अल्पायुष्य वगैरे नव्हतं पण माझा प्रश्नाथर्क चेहेरा बघून तो म्हणाला "मला काही आजार वगैरे नाहीये पण माझ्या छंदामुळे हा प्रश्न मी विचारला". असा कुठला छंद आहे जो ह्याला मरणाच्या दारपर्यंत घेउन जाऊ शकतो?
"मी सर्पमित्र आहे" तो म्हणाला, "सापांची मला लहानपणापासुन आवड आणि आता तो मी छंद म्हणून जोपासलाय. कोणाकडे घरात किंवा आवारात साप दिसला कि मला फोन येतो. माझ्या घरातले या छंदामुळे जरा नाराज आहेत पण कोणालातरी सापांना वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागेल." "Wow Great ! पत्रिकेत तसा काही धोका नसल्यामुळे तुम्ही हा छंद जरूर जोपासा" मी म्हंटल. पुढे तो म्हणाला "आजच सकाळी एक कॉल आला होता. मी तिकडून डायरेक्ट तुमच्याकडेच आलोय; माझ्याकडच्या सॅकमधे एक साप आहे" बाजूच्या सॅककडे बोट दाखवत तो म्हणाला. आतापर्यंत माझं consultation एका सापाच्या साक्षीने सुरु होतं हे ऐकून गंमत वाटली. माझ्या ऑफिस च्या आजुबाजुला बरीच मुंगुसं फिरत असताना मी बघितली आहेत पण सापाच्या उपस्थितीत केललं हे माझं पहिलचं Consultation !
अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com

Thursday, 11 April 2019

स्वभाव आणि पत्रिका


अंकिता (नाव बदललेलं आहे) माझ्याकडे तिच्या भावाची पत्रिका दाखवण्यासाठी आली होती. नोकरी संबंधी प्रश्नांची उत्तर देत असतांना मी म्हंटल कि हा मुलगा बऱ्याच नोकऱया बदलणार आहे.
 "म्हणजे कंपनीकडून काही प्रॉब्लेम  होणार आहे का?" अंकिताचा प्रश्न.
 मी : "नाही. हा स्वतःच अनेक नोकऱ्या सोडणार आहे, ह्याच्या आडमुठ्या आणि अहंकारी स्वभावामुळे ! नुसतं एवढंच नाही तर ह्याला जास्त काम न करता भरपूर पैसे मिळवायचे आहेत आणि त्यासाठी हा कुठलाही मार्ग अवलंबू शकतो".
हे ऐकून अंकिता थोडी अंतर्मुख झाली आणि म्हणाली " हो, बरोबर आहे, तो आहे तसा ! पण हा एवढा अचूक स्वभाव पत्रिकेवरून सांगता येतो?" अंकिताच्या चेहरयावर भावाच्या भवितव्यापेक्षा आश्चर्याचे भाव जास्ती होते. 
मी : "हो नक्कीच ! हे सगळं मी पत्रिकेवरूनच तर सांगतोय ना! तुमच्या भावाला तर मी ओळखत सुद्धा नाही"

अंकिताचं आश्चर्य आणि प्रश्न अनेक लोकांचा असतो. पत्रिकेवरून जसं भविष्य कळतं तसाच स्वभाव देखील कळतो. स्वभावानुसार भविष्यातल्या घटनांना माणूस कसा सामोरा जाईल हे कळतं. बऱ्याच गोष्टी सांगायला मदत होते पण स्वभाव म्हणजे भविष्य नाही. भविष्यात काय घटना घडणार आहेत हे स्वभावावर ठरत नाही. तसं असत तर मग चांगल्या स्वभाव असलेल्या  माणसाच्या आयुष्यात कायम चांगल्याच घटना घडल्या असत्या, पण तसं होत नाही कारण स्वभाव आणि नशीब ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

स्वभाव कळण्याचा उपयोग वैवाहिक आयुष्याबद्दल भविष्य सांगताना, आई वडिलांशी, भावाशी कसा वागेल हे सांगताना, अशा बऱ्याच गोष्टीत होतो. 

स्वभाव पत्रिकेतील खालील गोष्टींवर अवलंबून असतो,
* लग्नरास आणि नक्षत्र
* चंद्ररास आणि नक्षत्र
* लग्नाचा उपनक्षत्रस्वामी ज्या राशीत, नक्षत्रात आहे.
* लग्नातील ग्रह आणि लग्नेश ज्या राशीत आहे.

फक्त रास म्हणजे स्वभाव नव्हे ! पत्रिकेत इतर अनेक गोष्टी असतात ज्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव अवलंबून असतो आणि त्यातील एक गोष्ट "रास" असते. पत्रिकेत बाकीचे ग्रह वेगळे असतील तर 'मेष' राशीचा माणूस देखील अत्यंत लाजाळू आणि शांत असू शकतो. 

'स्वभाव हा मोठेपणीच ठरतो' - हा एक गैरसमज आहे.  कालच मी एका ३ वर्षाच्या मुलाच्या आईला त्याचा स्वभाव अचूक सांगितला, त्यामूळे 'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' हे काही खोटं नाही.  मुलाचा स्वभाव त्याच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत देखील येतो त्यामुळे शिक्षणाबद्दल भविष्य मार्गदर्शन करताना सुद्धा स्वभाव कळण्याचा फायदा असतो. 

स्वभाव मोठेपणी बदलतो का? हो बदलतो पण संपुर्ण नाही. पत्रिकेमध्ये महादशा (आयुष्यातले मोठे काळ) असतात त्यानुसार मूळ स्वभाव थोडा बदलू शकतो पण संपूर्ण स्वभाव कधीच बदलत नाही, स्वभावाची तीव्रता कमी किंवा जास्त होऊ शकते. जसं, जास्ती रागीटपणा कमी होऊ शकतो पण जात नाही तसंच कमी रागीटपणा पुढे वाढूही शकतो. 

अभय गोडसे
For Appointment,


Monday, 17 December 2018

मला मुक्ती मिळेल का?



साधारण ५५ वर्ष वयाच्या एका Client ने मला दोन प्रश्न विचारले, "माझी नोकरी टिकेल का? आणि मला काही आजार होतील का?" पत्रिकेनुसार याची उत्तरं देउन झाल्यावर त्यांनी मला तिसरा प्रश्न विचारला कि "या जन्मात मला मुक्ती मिळेल का?" ज्योतिषशास्त्रात मुक्ती मिळेल किंवा नाही यासाठी अनेक नियम दिलेले आहेत जसं अमुक तमुक ग्रहांची युती असेल तर, व्ययेश अमुक तमुक राशीत ह्या ह्या भावात असेल तर वगैरे असे अनेक, पण मी यापैकी कुठलाही नियम न बघता सरळ "नाही" असं उत्तर दिलं ! आता तुम्ही म्हणालं कि असं कसं काहीच न बघता तुम्ही उत्तर दिलत? सांगतो ! 'मुक्ती' ही आध्यात्मिक उन्नतीची शेवटची पायरी, षडरिपु, भौतिकसुखं ह्या सगळ्या पल्याड ती असते, 'जन्म मृत्यु' च्या फेऱ्यातुन सुटका, त्या नंतर पृथ्वीवर कधीच जन्म होत नाही (१% झालाच तरी तो फक्त लोकं कल्याणासाठी होतो). असं असताना नोकरीच्या चिंतेत आणि आजाराची भीती असलेला माणूस हा मुक्तीच्या जवळ 'ह्या जन्मात' तरी पोहोचू शकणार नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे कुठल्याही ज्योतिषाकडे "मला मुक्ती मिळेल का हो?" असा प्रश्न विचारायला गेले नव्हते. मुळात अध्यात्माच्या शेवटच्या पायरीवर असलेला माणूस कुठल्याही ज्योतिषाकडे जाऊन काहीच विचारणार नाही.
प्रश्नांची उत्तरं देताना ज्योतिषाने तारतम्य ठेवणं देखील आवश्यक आहे. "मी या वर्षी मंगळावर जाईन का? वय वर्ष ४० असताना आता माझी उंची वाढेल का?" या आणि अशा प्रश्नांची उत्तरं देताना पत्रिका बघण्याची गरज नसते कारण अशा प्रश्नांची उतरं 'नाही' च असतात.

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com

Thursday, 9 August 2018

प्रारब्धाचा पोस्टमन



प्रसंग १ : मागची दोन वर्ष सुनील सीए Final च्या परीक्षेत काही केल्या पास होत नव्हता म्हणून माझ्याकडे सल्ला घेण्यासाठी आला होता. सुनीलची पत्रिका 'सीए होणार' हे ठळकपणे दर्शवित होती.  सहा महिन्यानंतरचा काळ पास होण्यासाठी खूप चांगला होता म्हणून मी त्याला त्या काळात परीक्षा द्यायला सांगितलं आणि सहा महिन्यांनी सुनील नुसताच पास नाही तर चांगल्या मार्कांनी सीए झाला. सुनील म्हणाला, "सर, मी आज फक्त तुमच्यामुळेच सीए होऊ शकलो" !

प्रसंग २ : अमितच लग्न होऊन २ वर्ष झाली होती पण बायकोशी अजिबात पटत नव्हतं. रोजच्या भांडणाला कंटाळून तो माझ्याकडे पत्रिका दाखवायला आला होता. दोघांच्याही पत्रिका 'घटस्फोट होणार' हे स्पष्टपणे दाखवत होत्या त्यामुळे त्याला तसं स्पष्टपणे सांगावंच लागलं. अमित खूप निराश झाला आणि म्हणाला कि सर मला तुमच्याकडून सगळंच निगेटिव्ह ऐकायला मिळालं.  तुम्ही काहीतरी पॉसिटीव्ह सांगाल असं वाटलं होतं. 

वरील दोन्ही प्रसंग जरी वेगळे असले तरी त्यातून हे कळतंय कि यशाचे श्रेय किंवा अपयशाचं दूषण हे ज्योतिषालाच दिलं जातं. माझ्यामते  हे दोन्हीही चुकीचंच आहे. ज्योतिषी हा कधीच तुमचं यश किंवा अपयश ठरवतं नाही, तो फक्त आणि फक्त पत्रिकेत काय आहे एवढंच सांगू शकतो, तुमचं नशीब तो ठरवत नाही, किंबहुना ठरवूच शकत नाही. जर तुमचं नशीब तो ठरवू शकत असता तर ज्योतिषाने पहिल्यांदा स्वतःच नशीब बदलून घेतलं असतं. आपलं नशीब हे आपल्या प्रारब्धामुळेच असतं तेंव्हा त्यासाठी ज्योतिषाला दूषण किंवा श्रेय देण्याचं काहीच कारण नाही. हां, उपायांच्यामुळे वाईट गोष्टींची तीव्रता कमी होऊ शकते हे बरोबर आहे पण ज्या गोष्टी मूळ पत्रिकेतच नाहीत त्या उपाय करून आणता येत नाहीत. 

पत्रिकेत वाईट गोष्टी असताना ज्योतिषाने तुम्हाला बरं वाटण्यासाठी कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरीही वाईट असेल तर वाईटच होणार, तात्पुरते तुम्ही खुश व्हाल पण पुढे घडायचं ते घडणारच आहे. पत्रिकेत वाईट गोष्टी असताना सुद्धा काही ज्योतिषी समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून फक्त चांगलंच सांगतात, ही फक्त वरवरची मलमपट्टी होते, फार काळ जातकाला (ज्याची पत्रिका आहे तो) ह्याचा उपयोग होत नाही, कधी ना कधी सत्याला सामोरं जावंच लागतं.  इथे ज्योतिषी आणि जातक दोघांचीही चूक असते. काही जातकांची, 'आपल्याला चांगलं भविष्य सांगेल तो "चांगला" ज्योतिषी', अशी बालीश विचारसरणी असते, हा शुद्ध वेडेपणाच म्हणावा लागेल. चांगलं किंवा वाईट ह्यापेक्षा "खरं" भविष्य सांगेल तो चांगला ज्योतिषी, असं म्हणणं योग्य आहे. काही जातक एखाद्या ज्योतिषाचा संदर्भ दुसऱ्याला देताना देखील "ते 'चांगलं' सांगतात, त्यांच्याकडे जा" असं सांगतात, ह्यापेक्षा "ते 'खरं' सांगतात, त्यांच्याकडे जा, असं सांगणं अभिप्रेत आहे.     

ज्योतिषी हा एखाद्या पोस्टमनसारखा असतो. तुमच्या नशिबाचे किंवा प्रारब्धाचे निरोप पोहोचवणारा दूत ! त्याला निरोप लिहिण्याचा किंवा ते बदलण्याचा अधिकार नाही, फक्त ते निरोप चांगल्या रीतीने आणि वेळेत जातकापर्यंत पोहोचवणे एवढंच त्याच काम ! 

एखाद्या ज्योतिषाचे आभार मानणं किंवा त्याला  थँक्यू म्हणणं ठीक आहे पण खरे आभार देवाचे माना कि त्याने तुमचं 'खरं' भविष्य सांगण्याची शक्ती त्या ज्योतिषाला दिली, कारण शेवटी कुठलाही ज्योतिषी हा असतो फक्त तुमच्या "प्रारब्धाचा पोस्टमन" !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com



Thursday, 19 April 2018

वाटचाल ज्योतिषशास्त्राची..


एका राजाच्या पदरी एक 'मिहिर' नावाचा ज्योतिषी होता. एकदा त्याने राजपुत्राची पत्रिका बघुन भविष्य वर्तवल की, हा राजपुत्र वयाच्या अमुक अमुक दिवशी एका ठराविक वेळी वराहाचे म्हणजे रानडुकराचे शिंग पोटात घुसून मृत्यु पावेल. झालं! राजानं फर्मान सोडलं की राज्यात एकही रानडुक्कर शिल्लक राहता कामा नये. राजाच्या हुकुमानुसार राज्यात एकही रानडुक्कर शिल्लक राहीलं नाही. मिहिरनी सांगितल्यानुसार राजपुत्र त्या ठराविक वयाचा झाला. त्यांनी सांगितलेला तो दिवस देखील उजाडला. राजपुत्राला महालातच त्याच्या कक्षात ठेवलं होतं, सतत पहारा होता,  मिहिर ज्योतिषाने सांगितलेली ती ठराविक वेळ झाली आणि राजाने मिहिरला सांगीतल की, बघ! तुझं भविष्य खोट झालं. मिहिर हसला व म्हणाला की, 'शक्यच नाही. राजपुत्र कक्षात नाही. त्याला बोलावून बघा हवं तर! राजाने राजपुत्राला बोलावून आणायला माणसं पाठवली. राजपुत्र कक्षात नव्हता, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली पण राजपुत्र मिळेना...काही वेळाने शिपायांनी बघितलं की राजपुत्र राजमहालाच्या गच्चीवरून खाली पडून राजाच्या राज्याचे प्रतिक असलेल्या वराहाच्या लोखंडी प्रतिकृतीचे शिंग पोटात घुसल्यामुळे मरण पावला आहे. राजाला राजपुत्राच्या मृत्युचे दुख: होऊन देखील ज्योतिष मिहिरच्या ज्ञानाची खात्री पटली होती. अशा या मिहिर ज्योतिषाला पुढे 'वराहमिहिर' या नावाने ओळखले जाऊ लागले. ही झाली एक ऐतिहासिक गोष्ट, सांगायचा उद्देश हा की, ज्योतिषशास्त्र हे किती प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. याचा आपल्याला अंदाज येईल. नक्की ज्योतिषशास्त्राचा उगम कधी झाला? ह्या प्रश्नाचं उत्तर देण थोडसं अवघड आहे. पण अतिप्राचीन म्हणजे अगदी ऋषीमुनींच्या काळापासून ज्योतिषशास्त्र चालात आलेलं आहे आणि पुढे अनेक गुरुजनांनी त्यात अनेक प्रकारे भर घातली. पुढे ज्योतिषशास्त्राच्या किंवा भविष्यकथनाच्या वेगवेगळ्या पध्दती अस्तित्वात येत गेल्या, नुसती नावं घ्यायची म्हटलं तरी पारंपारिक ज्योतिष पध्दती, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती, हस्तसामुद्रीक, संख्याशास्त्र, लालकिताब, रमल, लोलकविद्या, भृगृसंहिता, नाडी ज्योतिष. इथपासून ते टॅरोट (Tarrot) पर्यंत अनेक आहेत. काही ठिकाणी मेंढपाळ नुसते आकाशाकडे बघुन देखील काही गोष्टी वर्तवितात, असही मी ऐकलयं. दैवी उपासनेमुळे किंवा दैवी देणगी लाभलेले काहीजण हे अंर्तज्ञानाने देखील भविष्य कथन करतात. ह्या सर्व भविष्यकथनाच्या पध्दतींमधे अभ्यासावर आधारलेल्या ज्योतिषपध्दतीमध्ये 'कुंडलीशास्त्र' म्हणजेच जन्मकुंडली द्वारे भविष्यकथन करण्याच्या पध्दती ह्या जास्त अचुक मानल्या जातात, कारण त्या व्यक्तीच्या जन्मतारीख, जन्म वेळ व जन्मठिकाणावर आधारीत ज्योतिष पध्दती आहेत. पत्रिकेद्वारे भविष्यकथनाच्या पध्दतीत, दोन मुख्य पध्दती आहेत त्या म्हणजे, पारंपारिक ज्योतिष पध्दती व कृष्णमर्ती पध्दती. त्यामध्ये देखील, कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दती ही अचुकतेसाठी जास्त ओळखली जाते.

इतक्या अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्र चालत आलेलं असलं तरी ते स्थितीशील (static) मात्र नक्कीच नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात अनेक गुरूजनांनी व अभ्यासकांनी अनेकप्रकारे भर घातलेली आहे, त्यामुळे उगाचच 'एवढ्या जुन्या काळाचे नियम आत्ता कुठे लागु होणार!' असं म्हणून ज्योतिषशास्त्राला कमी लेखायची काही गरज नाही एवढी अनेक वर्ष होऊनदेखील पृथ्वी अजुन सुर्याभोवतीच फिरते आहे ना? चंद्र पृथ्वीभोवतीच फिरतो आहे ना? म्हणजेच काय, तर मुलभूत गोष्टी त्याच असतात पण एखाद्या विषयाची प्रगती होण्याकरीता त्यात भर घालावी लागते आणि ज्योतिषशास्त्रात मुख्यत्वेकरून ही भर घालावी लागते ती ज्योतिष नियमांच्या अवलंबाविषयी (application विषयी) , म्हणजे कसं? समजा, १९५० साली एखाद्या माणसाने ज्योतिषाला विचारलं असत की, 'मला वाहनसुख आहे का?' तर ती एक विचार करण्यासारखी गोष्ट होती. कारण त्या काळात फक्त श्रीमंतांनाच ती चैन परवडत होती, पण हाच प्रश्न आजच्या काळात विचारला तर तो हास्यास्पद ठरेल कारण आज कनिष्ठ मध्यमवर्गाकडे देखील वाहनं (किमान दुचाकी तरी) असतचं! स्वत:ला अति बुध्दीमान समजणारी मंडळी काही वेळेला विचारतात की, 'माहिती तंत्रज्ञान' क्षेत्र (information technology) हे ज्योतिष शास्त्रात कसं बघणार? कारण प्राचीन काळी तर हे क्षेत्र अस्तित्वातच नव्हत! ज्योतिषशास्त्रामधे हे क्षेत्र मंगळ-बुधाच्या अंमलाखाली विचारात घेतलं जातं आणि ते विचारात घेतल्याला सुध्दा आत्ता बराच काळ उलटून गेला आहे.


कुठलही भविष्यकथन करताना 'काळ' आणि 'स्थळ' याच भान सोडून चालत नाही. उदाहरणार्थ, पूर्वीच्याकाळी मुला-मुलींची लग्न ही वयाच्या आठव्या-नवव्या वर्षीच होत. त्यावेळेला लग्न उशीरा होईल असं भविषयकथन केल्यास त्याचा अर्थ फार फार तर १२-१५ व्या वर्षी होईल, असा होत असे. पण, हेच भविष्यकथन सध्याच्या काळात केलं तर त्याचा अर्थ वयाच्या २८ नंतर किंवा कदाचित आणखी उशीरा असा देखील होऊ शकतो. ग्रह-तारे, राशी, ग्रहांचे भ्रमण ह्या सर्व गोष्टी तशाच असुन देखील काळ बदलल्यामुळे भविष्यकथनात फरक होत जातो, तो असा! भविष्यकथनात 'स्थळाचा' देखील विचार करावा लागतो. समजा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत अमुक अमुक काळात घटस्फोट होण्याची शक्यता आहे, असं असेल आणि तो माणूस जर अमेरिकन असेल तर घटस्फोट नक्की होईल असच सांगाव लागेल. कारण, तिथे 'रात्री झोपल्यावर नवरा खूप घोरतो' ह्या कारणासाठी सुध्दा घटस्फोट घेतला जातो. तेच जर का तो माणूस भारतीय असेल तर मात्र नीट विचार करून मगच उत्तर द्यावं लागेल. कारण भारतात अजुन अमेरिकेइतक्या सहजतेने घटस्फोट देण्याची प्रथा रूढ नाही. एका ज्योतिषाने म्हटल्यानुसार, 'ज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा विलास आहे', हेच खरं !

ज्योतिषशास्त्र हे कायम वादाच्या भोव-यात असतं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्योतिषशास्त्र खरं की खोटं असे कितीही वाद झाले तरी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, इतके अनेक वाद होऊन सुध्दा ज्योतिषशास्त्र अजुन टिकून आहे. आणि जी गोष्ट वादाच्या भोव-यात राहून देखील वर्षानुवर्षे टिकून आहे त्या अर्थी त्यात नक्कीच काहीतर 'तथ्य' असलं पाहिजे कारण ज्यात 'तथ्य' असतं, तेच 'टिकतं' अन्यथा बुडबुड्याप्रमाणे थोड्या कालावाधीनंतर नाहीसं होतं. 

ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, ज्योतिष हे शास्त्र जरी असलं तरी ते २+२=४ असं शास्त्र नाही. मुलत: सगळे नियम थोडयाफार फरकाने तेच असतात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत त्याचं अवलंबन बदलतं जातं. डॉक्टर जसे रोग्याच्या अवस्थेनुसार औषधाची मात्रा ठरवतात तसच प्रत्येक पत्रिकेची गणितं ही वेगवेगळी असतात. 'सब घोडे बारा टक्के', अस चालत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, ज्योतिषशास्त्राची अचुकता ही शास्त्राबरोबरच ज्योतिषी व्यक्तीवर देखील अवलंबून असते. ज्योतिषी व्यक्तीची स्वत:ची बुध्दीमत्ता, आकलन शक्ती, त्याचं ज्योतिषाविषयीचं ज्ञान, त्याचं ज्योतिषाव्यतिरिक्त इतर विषयाचं ज्ञान, इत्यादी अनेक गोष्टींवर ही अचुकता अवलंबुन असते. डॉक्टर अनेक असतात पण तज्ञ डॉक्टर थोडेच असतात, तसच ज्योतिषाच्या बाबतीत देखील आहे. त्याचप्रमाणे, ज्योतिषी व्यक्ती आणि जातक (ज्याच भविष्य बघत आहात तो) ह्यांची नाळ देखील जुळावी लागते, आपल्याला जसं काही वेळेला एखादया डॉक्टरचचं औषध लागू पडतं, इतर डॉक्टरांशी आपलं फरसं जुळत नाही, अगदी तसच इथे सुध्दा आहे.
ज्योतिषशास्त्रात भर घालण्याच काम अनेक ज्योतिषांनी जरी केलेलं असलं तरी ज्या दिग्गजांनी अगदी मुलभूत संशोधन केलय जसं प्रो. के. एस. कृष्णमुर्ती यांनी नवीन ज्योतिष पध्दती शोधली किंवा ज्यांनी कोणी ज्योतिषशास्त्राचं मुळ शोध कार्य केलं असेल त्यांना मानाचा मुजराच करायला हवा! अर्थातच त्यांच्या ह्या कार्याला दैवी मार्गदर्शन लाभल असलचं पाहिजे, त्याशिवाय ते खूप अवघड वाटतं. ज्योतिषशास्त्राची आणखी माहिती करून घेण्याआधी मुळात ज्योतिषशास्त्राची वाटचाल माहित असणंही तितकच महत्त्वाच असतं, म्हणूनच हा लेखप्रपंच!

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com


Wednesday, 4 April 2018

लग्नाआधीच घटस्फोटाचे संकेत..

 


"माझं लग्न कधी होईल?" माझ्यासमोर बसलेल्या २५ वर्षाच्या भारतीने (नाव बदललं आहे) प्रश्न विचारला. प्रत्येक लग्नाळू मुलामुलींचा हा नेहमीचा प्रश्न ! मी पत्रिका बघितली आणि दोन मिनिटं काहीच बोललो नाही, काय सांगावं असा प्रश्न पडला. 

ज्योतिषशास्त्रात सप्तमस्थान हे लग्नासाठी बघितलं जातं. कृष्णमूर्ती पद्धतीनुसार भारतीच्या पत्रिकेत सप्तम स्थानाचा उपनक्षत्रस्वामी  शनी षष्ठात होता, त्याचा नक्षत्रस्वामी मंगळ हा देखील कस्प कुंडलीत षष्ठात येत होता. कृष्णमूर्ती पद्धतीत लग्नासाठी २,७,११ ही पूरक स्थानं आणि १,६,१० ही विरोधी स्थानं मानली जातात. इथे पूरक पेक्षा विरोधी स्थानंच जास्त बलवान होती, म्हणजे लग्न तर होणार पण वैवाहिकसुख, संसारसुखाची वानवा दिसत होती. त्यातच तीची साडेसाती देखील सुरु होती. तरीसुद्धा, काही सांगण्याआधी महादशा बघणं नेहमीच महत्वाचं असतं. 'महादशा' म्हणजे 'दशा' ह्या अर्थान नेहमी फक्त वाईट असं नसून, पत्रिकेतला एक मोठा काळ एवढाच घ्यावा, चांगला कि वाईट हे त्या त्या पत्रिकेवर अवलंबून असतं. 

ज्या वयात लग्न होणार आहे त्या वेळची महादशा बघणं आवश्यक असतं. भारतीची केतू आणि त्या नंतरची शुक्राची महादशा देखील षष्ठ स्थान आणि इतर विरोधी स्थानांशी संबंध दाखवतच होती, म्हणजे संसारसुखाचा भाग कठीणच दिसत होता. 

मी म्हंटलं "तुमचं लग्न तर योग्य वयात म्हणजे वेळेतच होणार आहे पण पुढे एक प्रॉब्लेम आहे". "म्हणजे नेमकं काय?" भारतीने विचारलं. मी म्हंटलं "लग्न जरी योग्य वयात होणार असलं तरी तुमच्या पत्रिकेत घटस्फोट होण्याचे संकेत आहेत". "पण माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये, होणार नवरा कोण हे देखील माहीत नाहीये तर मग माझं नवऱ्याशी पटणार नाही हे आधीच कसं सांगता येईल? ह्याच्या आधीही मी काही ज्योतिषांना पत्रिका दाखवली होती पण अस कोणीच सांगितलं नाहीये!" भारतीचा प्रश्न. मी म्हंटलं "खरं म्हणजे वैवाहिक सुख हे नवरा आणि बायकोची दोंघांची पत्रिका आणि Match Making ह्या तीनही गोष्टीवर अवलंबून असतं पण इथे तुमच्याच पत्रिकेत इतके प्रॉब्लेम्स असताना नवऱ्याची पत्रिका आणि match making काहीही जरी असलं तरी त्याने फार काही फरक पडेल असं वाटत नाही. म्हणजे, समजा एखाद्या परीक्षेत ३ पेपर्स आहेत आणि पहिल्याच पेपर मधे जर एखाद्याला १०० पैकी  १० मार्क मिळाले आणि उरलेल्या दोन पेपर्स मधे १०० पैकी ८० जरी मिळाले तरी शेवटी परीक्षा नापासच होणार, हे तसंच आहे ! म्हणून नवरा निवडताना खूप काळजी घेणं तुमच्या बाबतीत फार महत्वाच आहे. दुसरं म्हणजे, इतर ज्योतिषांनी हे तुम्हाला का सांगितलं नाही किंवा का सांगू शकले नाहीत हे मी कसं सांगणार?, मी माझं मत तुम्हाला देऊ शकतो, बाकी कोण खरं आणि कोण खोटं हे येणारा काळच ठरवेल." भारतीने हे सगळं काळजीपूर्वक ऐकलं, समजून घेतलं आणि गेली. 

पुढे साधारण दोन वर्षांचा काळ निघून गेला आणि एके दिवशी भारतीने परत अपॉइंटमेंट घेतली. खुर्चीवर बसल्या बसल्या भारती म्हणाली " मी तुमच्याकडे दोन वर्षांपूर्वी लग्नाचा प्रश्न घेऊन आले होते", मी भारतीला मधेच थांबवत म्हंटलं "माझ्याकडे येणाऱया प्रत्येक Client च सगळं रेकॉर्ड माझ्याकडे असतं, त्यात मी सांगितलेले मुद्दे देखील असतात. आत्ता काय विचारायचं तिथून सुरुवात केली तरी चालेल. भारतीने सांगायला सुरुवात केली "मागच्या वर्षी माझं लग्न झालं. मुलाची जितकी माहिती काढता आली तितकी काढून सुद्धा लग्नानंतर बऱ्याच नवीन गोष्टी लक्षात आल्या, त्याला काही हेल्थ प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी माझ्यापासून पूर्णपणे लपवून ठेवले, त्यातून पुढे आणखी प्रॉब्लेम्स वाढत गेले आणि आता मी घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत आलेली आहे, परत तुमचा सल्ला हवाय !". सगळं ऐकून मी म्हंटलं "आता नवीन सल्ला काय देणार, जो सल्ला द्यायचा होता तो आधीच दिलेला आहे. Things are already very clear. तरीसुद्धा नवऱ्याची पत्रिका बघून एकदा खात्री करू". नवऱ्याच्या पत्रिकेत सुद्धा वैवाहिक सुख बिघडलेलंच होत म्हणजे आता घटस्फोट होणार ही काळ्या दगडावरची रेघ ! निघताना भारती म्हणाली "माझा घटस्फोट होणार आहे हे माझ्या लग्नाच्या आधीच सांगणारे तुम्ही पहिलेच ज्योतिषी आहेत. ह्याची पूर्व सूचना मला तुम्ही दिलेली होती. मी देखील काळजी घेतली पण शेवटी व्हायचं ते झालंच". पुढे काही दिवसांनी भारतीचा घटस्फोट झाल्याचं देखील मला कळवण्यात आलं. 

ज्योतिषी हा फक्त एक पोस्टमन असतो. पत्रिकेतला गूढ संदेश जातकापर्यंत पोहोचवणे, हे त्याचं काम !  त्रयस्थपणे पत्रिका बघून ज्या काही गोष्टी असतील त्या जशाच्या तशा सांगणे हे त्याचं काम. चांगल सांगायचं कि वाईट हे त्याचा हातात नसतं !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
  

Saturday, 17 March 2018

पत्रिका न बघताच साडेसातीची खात्री !

   
  त्यादिवशी सुद्धा नेहेमीप्रमाणेच अँपॉईंटमेंट्स सुरु होत्या. नेहमीप्रमाणेच  जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण घेऊन भविष्य सांगणं सुरु होतं. शेवटच्या अपॉइंटमेंटसाठी एक जोडपं आलं, खुर्चीवर बसलं, मी तारीख वेळ ठिकाणं विचारलं आणि ते सांगणार, इतक्यात, इतका वेळ व्यवस्थित सुरु असलेला माझा लॅपटॉप अचानक हँग झाला. "होतं असं कधी कधी" असं म्हणून मी तो reboot केला, सॉफ्टवेअर ओपन करून Birth details टाकणार इतक्यात माझं इंटरनेट बंद पडलं. "इतके योगायोग एकाच वेळेला?" मी मनात म्हंटलं आणि त्याच क्षणी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला, मी त्यांना म्हंटलं "तुमच्या दोघांपैकी कोणाची साडेसाती सुरु आहे का?". ते दोघे अमराठी असल्यामुळे असेल कदाचित पण त्यांना त्यांची रास (चंद्र रास) माहिती नव्हती. मी त्यांना म्हंटलं "आतापर्यंत सुरळीत सुरु असलेली माझी सिस्टिम तुम्ही आल्याआल्या बंद पडली आणि ते देखील दोनदा ! माझा अनुभव मला असं सांगतो कि नक्की तुमच्या दोघांपैकी कोणाचीतरी साडेसाती सुरु असली पाहिजे. Of course, पत्रिका ओपन झाली कि ते कळेलच !". थोड्या वेळाने त्यांचे birth details सॉफ्टवेअर मधे टाकले आणि लक्षात आलं कि त्या दोघांपैकी बायकोची मकर रास होती आणि तिची साडेसाती सुरु होती. माझा संशय खरा ठरला ! पुढे त्यांच्याशी बोलताना कळलं कि अपॉइंटमेंट साठी येत असताना देखील त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता आणि त्यामुळे त्यांना अपॉइंटमेंटसाठी सुद्धा वेळेवर पोहोचता आलं नव्हतं. हा असा अनुभव जेव्हा जातकाचा वाईट काळ सुरु असतो त्या वेळेला येतो. दर वेळेला साडेसातीच सुरु असायला पाहिजे असं नाही पण कुठला तरी वाईट काळ सुरु असतो.  

हा झाला एक लहानसा अनुभव ! ज्योतिषी रोज अनेक जुन्या नवीन लोकांना भेटत असतात, रोज नवीन अनुभव, त्यामुळे काहीकाही वेळेला माणसांचे नुसते चेहेरे बघून सुद्धा बऱयाच गोष्टी पत्रिका न बघताच कळतात. कोणाचा कुठला ग्रह बलवान असावा ह्या विषयी सुद्धा काही गोष्टींचे अंदाज पत्रिका न बघताच बांधता येतात आणि नंतर पत्रिका बघितल्यावर त्याची खात्री पटते.  माझ्या ज्योतिषी मित्रांशी बोलताना देखील, काही माणसांना बघून "ह्याचा शुक्र खूप स्ट्रॉंग दिसतोय हां !" किंवा "ह्याचा शनी बलवान आहे बरं का !"  असे उद्दगार तोंडून निघतात. काही लोकांना तर ज्योतिषी पत्रिकेच्या परिभाषेतूनच ओळखतात, जसं "तो मेष लग्न वृश्चिक रास आहे रे" किंवा "ती कर्क लग्न मीन रास आहे हां !", समोरच्या ज्योतिषाला काय कळायच ते बरोबर कळतं !

शेवटी, एखाद्या विषयाच्या थेअरीचा कितीही अभ्यास केला तरी बऱ्याच वेळेला अनुभव हाच गुरु ठरतो तो असा !     

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com
  

Tuesday, 20 February 2018

पुन्हा तीच चूक..



वैवाहिक आयुष्याबद्दलच्या समस्या घेऊन येणारे clients देखील बरेच आहेत. प्रशांत (नाव बदललं आहे) देखील त्याच समस्येसाठी माझ्याकडे आला होता. त्याची आणि त्याच्या बायकोची पत्रिका बघितली. त्याच्या बायकोची पत्रिका प्रशांतच्या पत्रिकेपेक्षा संसारसुखासाठी फारच वाईट होती. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो कि "संसारसुख मिळेल का?" ह्या प्रश्नाच उत्तर देण्यासाठी नेहमीच नवरा आणि बायको, दोघांच्याही पत्रिका तपासाव्या लागतात कारण ते एकटयाच्या पत्रिकेवर कधीच अवलंबून असत नाही.  इथे बायकोची पत्रिका संसारसुखाच्या दृष्टीने फारच वाईट होती त्यामुळे बायकोच्या पत्रिकेमुळे सगळा प्रॉब्लेम झालेला होता. प्रशांतची पत्रिका तिच्यापेक्षा संसारसुखासाठी बरीच बरी होती. प्रशांतला म्हंटलं कि पुढच्या काही वर्षांचा कालावधी बघितला असता परिस्थितीत काहीच सुधारणा दिसत नाही, उलट आताचा काळ आणि पुढचे सहा महिने फारच वाईट आहेत, खरं सांगायचं झालं तर १००% घटस्फोट होण्याच्या indications आहेत. माझं बोलणं ऐकून प्रशांतची खात्रीच झाल्यासारखं वाटलं. तो म्हणाला "तुम्ही सांगताय अगदी तशीच परिस्थिती आत्ता आहे. घटस्फोटची प्रक्रिया कधीच सुरु झाली आहे आणि आता कोर्टाच्या एक दोन शेवटच्या तारखा आहेत, घटस्फोट निश्चित आहे". मी त्याला दिलासा देत म्हंटलं "एका अर्थी चांगलंच आहे कारण तुमची पत्रिका तुमच्या बायकोपेक्षा संसारसुखासाठी चांगली आहे. Remarriage च्या वेळेस पत्रिका चांगल्या असलेल्या एखाद्या मुलीशी लग्नं झालं तर निदान पुढे संसार सुखाचा तरी होईल" . 

थोडे दिवस गेले असतील, प्रशांत पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेऊन भेटायला आला. बसल्या बसल्या म्हणाला "सर, तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझा घटस्फोट झाला पण तरीही अजून माझी बायको माझ्या टच मधे आहे आणि ती मला आम्ही परत एकत्र यावं असं सतत सुचवतं असते. मी द्विधा मनस्थितीत आहे, काय करावं कळत नाही ". हे ऐकून मी त्याला बजावलं "अजिबात नाही ! तुझ्या बायकोच्या पत्रिकेतील संसारसुखासाठी वाईट असलेला काळ अजूनही सुरु आहे आणि पुढची बरीच वर्ष आहे. तीच चूक पुन्हा केलीस तर परत पस्तावशील. तिच्याशी पुनर्विवाहाचा विचार अजिबात करू नकोस. हां, जर तिचा पुढील काळ हा संसारसुखासाठी चांगला असता तर मी तुला अजिबात अडवलं नसतं. पण इथे परिस्थिती वेगळी आहे. एकदा फसला आहेस, पुन्हा नको ! ". "ठीक आहे" असं म्हणून प्रशांत गेला. 

साधारण वर्षभराचा काळं लोटला असेल. पुन्हा एकदा प्रशांत अपॉइंटमेंट घेऊन आला. आतातरी ह्याने एखाद्या चांगल्या मुलीशी पुनर्विवाह केला असावा असा मी विचार करत असतानाच, प्रशांत म्हणाला "सॉरी सर". "कशाबद्दल?" मी आश्चर्याने म्हंटलं. प्रशांत म्हणाला "सर मी परत तीच चूक केलीय ! मी माझ्या आधीच्याच बायकोशी पुनर्विवाह केलाय". मी कपाळावर हात मारला "अरे, मी मागच्या वेळेला एवढं सगळं सांगून सुद्धा तू परत तीच घोडचूक केलीस?". प्रशांत "हो सर, मी तिच्या गोड बोलण्याला फसलो आणि परत लग्न करायला तयार झालो. तिने परत त्रास देयला सुरुवात केलीय. आमचं अजिबात पटत नाहीये. रोज नवीन डोकेदुखी असते. मला कंपनीकडून US ला जाण्याचा चान्स आलाय पण मी परदेशात जाऊ नये म्हणून माझ्या बायकोने माझा पासपोर्ट देखील मुद्दामहून गहाळ केलाय, परत तोच सगळा मनस्ताप सुरु झालाय सर. आता पुढे काय?"  मी म्हंटलं " आता काय, परत ये रे माझ्या मागल्या, परत घटस्फोट, परत कोर्टाच्या चकरा, परत मनस्ताप ! ". ह्या वेळेला प्रशांत पुरता कोलमडून गेला होता पण सत्य सांगण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं ! 

ज्योतिषी हा फक्त मार्गदर्शक असतो, पुढे काय वाढून ठेवलंय हे सांगून, 'पुन्हा तीच चूक' न करण्याचा संदेश जातकाला देऊ शकतो पण त्याच नशीब लिहू किंवा बदलू शकत नाही !

अभय गोडसे,
For Consultation, visit KPJyotish.com or AbhayGodse.com


माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...